रत्नागिरी- निसर्ग चक्रीवादळाने कोकणातील काही गावे पूर्णतः उद्ध्वस्त केली आहेत. मंडणगड तालुक्यातील शिगवण गावची परिस्थिती पाहिल्यावर या चक्रीवादळाचे गांभीर्य लक्षात येते. डोंगरभागात वसलेले आणि निसर्ग सौंदर्याने नटलेले शिगवण गाव. या गावातील सर्वच घरे उद्ध्वस्त झाली आहेत. काही घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत. काहींचे छप्पर उडून गेले, काही घरांच्या भिंती कोसळल्या तर काही घरांची कौल फुटल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर आलेल्या पावसामुळे घरात पाणी शिरले आणि घरातील धान्य भिजले, भांडी वाहून गेली. घरात कपडेदेखील उरले नाहीत. एक-एक पैसा गोळा करून उभा केलेला संसार या वादळात वाहून गेला.
निसर्गाचा फटका: डोंगराच्या पायथ्याशी वसलेले शिगवण गाव उद्ध्वस्त - shigvan village ratnagiri
शिगवण गावातील सर्वच घरे उद्ध्वस्त झाली आहेत. काही घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत. काहींचे छप्पर उडून गेले, काही घरांच्या भिंती कोसळल्या तर काही घरांची कौल फुटल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर आलेल्या पावसामुळे घरात पाणी शिरले आणि घरातील धान्य भिजले, भांडी वाहून गेली. घरात कपडेदेखील उरले नाहीत. एक-एक पैसा गोळा करून उभा केलेला संसार या वादळात वाहून गेला.
डोंगराच्या पायथ्याशी नदी, आजूबाजूला आंबा-काजूच्या बागा, गावात टुमदार कौलारू घरे, मधेच एखादे पत्र्याचे किंवा दुमजली स्लॅबचे घर, आजूबाजूला झाडे असणारे हे सव्वाशे घरांचे गाव. गावातील काही जण रोजगारासाठी मुंबई-पुण्यात राहतात. येथील घरांचे नुकसान झाल्याने काही कुटुंब शाळेत राहत आहेत. घरे जमीनदोस्त झाल्याने दुसऱ्या निवाऱ्यात तरी किती दिवस काढायचे, असे अनेक प्रश्न गावकऱ्यांना सतावत आहेत. तर घरातील धान्य भिजल्याने खायचे काय? ही सर्वात मोठी समस्या आहे. कमी नुकसान झालेल्या घरांची डागडुजी करण्यास सुरुवात झाली आहे. गेले आठ दिवस वीज नसल्यामुळे बाहेर कुठेच संपर्क होऊ शकत नाही.
या भागात झालेल्या नुकसानीचे सध्या पंचनामे सुरू आहेत. मात्र, तातडीची मदत अद्यापही मिळालेली नाही. दुर्गम भागात वसलेल्या या गावाला पुन्हा उभे करण्यासाठी नुसती तुटपुंजी मदत देऊन भागणार नाही, तर त्यांना भक्कम आधाराची गरज आहे. या संदर्भात येथील नागरिकांशी बातचीत करत त्यांच्या भावना जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..