शिवसेना प्रवेशाविषयी मत नोंदविताना सुदेश मयेकर रत्नागिरीSudesh Mayekar:2019 च्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी उदय सामंत (Uday Samant) यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, त्याच उमेदवारानं आता शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. शरद पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी आज शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत आणि किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मातोश्री स्वरूपा सामंत आणि वडील रवींद्र उर्फ आण्णा सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पाली येथे मयेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. (Assembly Election)
तेव्हाच शिवसेनेत जाणार असल्याचं निश्चित झाले:सुदेश मयेकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. 2019 मध्ये सुदेश मयेकर यांनी 32 हजार मतं सामंत यांच्या विरोधात लढताना मिळवली होती. पण त्याच सुदेश मयेकर यांनी आता उदय सामंत यांना साथ दिली आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाला एक मोठा धक्का मानला जात आहे. सुदेश मयेकर यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हाच ते शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती. अखेर आज मंत्री उदय सामंत यांच्या पाली इथल्या निवासस्थानी त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
'या' कारणानं शिवसेनेत प्रवेश केला :याबाबत प्रतिक्रिया देताना सुदेश मयेकर यांनी सांगितलं की, गेली 24 वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. एक कार्यकर्ता, पदाधिकारी ते नगरसेवक अनेक पदं मी भूषविलेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी ऋणी आहे. पक्षाच्या सर्वच नेत्यांनी मला सहकार्य केलेलं आहे. मात्र काही वर्षानंतर राष्ट्रवादीचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्याशी माझं जुळेनासं झालं. जेव्हा मी आजारी होतो तेव्हा मंत्री उदय सामंत, किरण सामंत यांनी माझ्या कुटुंबाला आधार दिला. मात्र पक्षाकडून मला कोणतीही विचारणा किंवा फोनसुद्धा करण्यात आलेला नाही. एका बाजूला राष्ट्रवादीचे संबंध तुटायला आणि किरण सामंत यांनी मला घातलेली साद, याचा भविष्याच्या दृष्टीनं विचार करून मी शिवसेनेत प्रवेश केल्याचं सुदेश मयेकर यांनी यावेळी सांगितलं.
रत्नागिरीत एकत्र लढण्याची तयारी :रत्नागिरी तालुक्यात, शहरात शिवसेनेचे संघटन चांगल्या प्रकारे मजबूत करण्याचं काम आम्ही सर्वजण एकत्र मिळून करू. मला पदाची अपेक्षा नाही, किरण दादांचा आशीर्वाद हेच माझं मोठं पद आहे. पण भविष्यात जर मला जबाबदारी दिली तर ती मी नक्कीच चांगल्या प्रकारे पार पाडेन, असं सुदेश मयेकर यांनी यावेळी सांगितलं. गेल्या वेळी उदय सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढवत मयेकर यांनी 32 हजार मतं मिळवली होती.
हेही वाचा:
- आमदार अपात्रतेचा निकाल कसा असेल? खुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी 'ही' दिली माहिती
- संविधानाप्रमाणे निर्णय झाल्यास 40 आमदार अपात्र होतील - आदित्य ठाकरे
- कायद्याच्या चौकटीत 16 आमदार अपात्रच; कायदेतज्ञ उल्हास बापट