रत्नागिरी -रत्नागिरी शहरातील ओसवालनगर येथे एका बंगल्यात चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक पीडित युवती सापडली असून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांना मिळाली होती गुप्त माहिती -
ओसवालनगर येथील एका बंगल्यात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. जिल्ह्याबाहेरील तरुणी आणून या ठिकाणी अनैतिक व्यवसाय सुरू होता. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक हेमंतकुमार शहा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली टिमने एका बनावट ग्राहकामार्फत यातील एका व्यक्तीशी संपर्क साधला होता. बनावट गिहाईक तयार करून भेटीची वेळ ठरवण्यात आली. गुरुवारी दुपारी ओसवाल नगर परिसरात सापळा लावण्यात आला. बनावट ग्राहक बनून आत गेल्यानंतर पोलीसांच्या पथकाने बंगल्यावर धाड टाकली.