रत्नागिरी - गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील सावर्डेमध्ये शिमगोत्सवात होल्टेहोमचा खेळ खेळण्याची परंपरा आहे. यामध्ये जळकी लाकडे म्हणजेच होल्टे एकमेकांवर देवाच्या नावाने फेकले जातात. यामध्ये कोणत्याही प्रकारची ईजा वा हानी होत नाही.
शिमगोत्सवात सावर्डेमध्ये होल्टेहोमची परंपरा....
रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डेमध्ये शिमगोत्सवात होल्टेहोमचा खेळ खेळण्याची परंपरा आहे. यामध्ये जळकी लाकडे म्हणजेच होल्टे एकमेकांवर देवाच्या नावाने फेकले जातात.
हा खेळ ज्याला खेळायचा आहे तो खेळण्यापुर्वी सकाळपासून उपवास धरतो. त्यानंतर रात्री सर्व जण एकत्र आल्यावर मैदानाच्या एका बाजूला गावातील मानकरी तर दुसऱ्या बाजूला गावातील खोत मंडळी उभे राहतात. आपापल्या परीसरातील, वाडीतील सतत नऊ दिवस पेटवत असलेल्या होळीची जळकी लाकडे एकत्रीत करुन ती पेटवून ती ठरावीक जळाल्यावर ते प्रत्येक जण जळके व्होल्टे (लाकडे) उचलून मैदानात खेळ खेळण्यासाठी येतात. या खेळाला देवांच्या हाकांनी बोंबाबोंब मारुन सुरुवात करतात. पाचव्या हाकेला ते एकमेकांच्या अंगावर जळके निखारे फेकतात.
ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. हा होल्टेहोम कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित असतात.