रत्नागिरी -रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय सहकार पॅनेलचे वर्चस्व अबाधित राहिले आहे. निवडणूक झालेल्या सात पैकी पाच जागांवर सहकार पॅनलने विजय मिळवला आहे. तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, यापूर्वी 14 जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे आता 21 पैकी 19 जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार निवडून आल्यानं जिल्हा बँकेवर सहकार पॅनलची निर्विवाद सत्ता आली आहे. तर विरोधी अपक्ष अजित यशवंतराव दुग्ध मतदार संघातून आणि लांजा तालुका मतदारसंघातून भाजप अध्यक्ष महेश खामकर हे प्रथमच संचालक म्हणून निवडून आले आहेत. सहकारचे जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सोपान शिंदे, निवडणूक निरीक्षक तथा उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 9 वाजता जिल्हा नगर वाचनालयाच्या दुसऱ्या मजल्यावर मतमोजणीला प्रारंभ झाला. दोन तासांत सात मतदारसंघातील मतमोजणी संपुष्टात आली.
जिल्हास्तरीय विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघातून सहकार पॅनेलचे सुरेश मारूती कांबळे यांना 692 मते, सचिन चंद्रकांत बाईत यांना 164 मते मिळाली. सुरेश कांबळे हे 528 मतांनी निवडून आले. जिल्हास्तरीय मजूर संस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे दिनकर गणपत मोहिते यांना 48 मते, राकेश श्रीपत जाधव यांना 45 मते मिळाली. विद्यमान संचालक दिनकर मोहिते केवळ तीन मतांनी निवडून आले आहेत.
जिल्हास्तरीय नागरी पतसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे संजय राजाराम रेडीज यांना 66 मते, ॲड. सुजित भागोजी झिमण यांना 56 मते मिळाली. विद्यमान संचालक संजय रेडीज 10 मतांनी निवडून आले आहेत. जिल्हास्तरीय दुग्धसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे गणेश यशवंत लाखण यांना 10 मते, अजित रमेश यशवंतराव यांना 25 मते मिळाली. अजित यशवंतराव 15 मतांनी निवडून आले आहेत. रत्नागिरी तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे गजानन कमलाकर पाटील यांना 33 मते, प्रल्हाद महादेव शेट्ये यांना 8 मते मिळाली. गजानन पाटील 25 मतांनी निवडून आले आहेत.
लांजा तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे आदेश दत्तात्रय आंबोळकर यांना 16 मते, महेश रवींद्र खामकर यांना 18 मते मिळाली. भाजप तालुकाध्यक्ष महेश खामकर हे केवळ दोन मतांनी निवडून आले आहेत. माजी संचालक सुरेश विष्णू साळुंखे यांच्या अथक प्रयत्नातून आपला विजय साकार झाल्याची प्रतिक्रिया महेश खामकर यांनी व्यक्त केली. गुहागर तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे अनिल विठ्ठल जोशी यांना 13 मते, चंद्रकांत धोंडू बाईत यांना 8 मते मिळाली आहेत. अनिल जोशी 5 मतांनी निवडून आले आहेत. विद्यमान संचालक चंद्रकांत बाईत, गणेश लाखण, आदेश आंबोळकर यांना पराभव पत्कारावा लागला आहे.