रत्नागिरी -गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असून काही ठिकाणी नुकसानीच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान, पुढील दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन आणि त्यासंबंधित यंत्रणादेखील सतर्क झाल्या आहेत.
24 तासांत सरासरी 89.07 मिमी पावसाची नोंद -
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 89.07 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर एकूण 801.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड तालुक्यात 102.10 मिमी, दापोली 89.20 मिमी, खेड 70.70, गुहागर 94.80 मिमी, चिपळूण 70.40 मिमी, संगमेश्वर 67.60 मिमी, रत्नागिरी 86.50 मिमी, राजापूर 99.60 मिमी, लांजा 120.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे.