रत्नागिरी - रिफायनरी प्रकल्पावरून कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांचे कौतुक केले, तर आमदार राजन साळवी यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचा अध्यादेश रद्द करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात सामंत यांनीच महत्त्वाची भूमिका मांडली, तर आमदार राजन साळवी यांचे योगदान नसल्याचे वालम म्हणाले.
राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द झाला आहे. यामध्ये कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीने महत्वाची भूमिका पार पाडली. प्रकल्प रद्द होण्यासाठी समितीने सर्वच पक्षांना साकडे घातले होते. अखेर जनतेच्या हट्टामुळे प्रकल्प रद्द करावा लागला. शिवसेनेने शेवटच्या क्षणी महत्त्वाची भूमिका बजावली.