रत्नागिरी- कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील कुवारबाव येथे ट्रकला रिक्षाने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात 13 वर्षीय मुलासह त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास हा अपघात झाला आहे.
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर ट्रक-रिक्षाचा भीषण अपघात हेही वाचा -मुंबईमध्ये 'नॉर्थ फर्स्ट अनसंग हीरोज रेड कार्पेट सोशल पुरस्कार' सोहळा पडला पार
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथून मिरजोळे एमआयडीसी येथे जाणारा ट्रक (क्र. एमएच 0 9 सी यू 8044) हा कांचन हॉटेल चौकातून एमआयडीसीकडे वळत होता. यावेळी रेल्वे स्थानकाकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत रिक्षातील 13 वर्षीय मुलासह त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला.
संतोष जाणू बावदाने, मुलगा श्रेयस संतोष बावदाने अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. तर, रिक्षाचालक संजय धोंडू आखाडे हेही जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल लाड हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून रात्री उशिरा अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अपघातग्रस्त रिक्षा रत्नागिरी शहरातील आहे.