रत्नागिरी- आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आता थेट केंद्र सरकारला साकडे घातले आहे. यावर्षी आंबा हंगाम उशिरा सुरू झाला, त्यात उत्पादनही अवघे तीस टक्के आहे. सध्या आंब्याचा दर हा स्थिर आहे, मात्र असे असले तरी यावर्षी कोरोनाचा फटका आणि उत्पादन कमी असल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्याला त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ द्यावी आणि त्यावरील व्याज हे केंद्र सरकारने भरावे, अशी विनंती आंबा उत्पादक शेतकरी तथा माजी आमदार बाळ माने यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी ३० जून २०२० ऐवजी ३० जून २०२१ अशी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी बाळ माने यांनी केली आहे. कोकणातील महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे आंबा व्यवसाय. या व्यवसायाच्या माध्यमातून तिन्ही जिल्ह्यात जवळपास २ हजार कोटींची उलाढाल वर्षाकाठी होत असते. तसेच जवळपास १२०० कोटी रुपयांचे कर्ज आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर आहे. मात्र, यावर्षी अवघे ३० टक्के उत्पादन झाले आहे. त्यात आंबा हंगाम उशिरा सुरू झाला. कोरोनाचेही सुरुवातीला ग्रहण लागले. मात्र सध्या दर स्थिर आहेत, तरीही उत्पादन कमी असल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे.