रत्नागिरी -चिपळूणमध्ये सध्या पावसाने हाहाकार उडवला आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहर जलमय झालं आहे. शहरात पुराच्या पाण्याने वेढा दिला असून पाऊस आणि पुराने हाहाकार उडवला आहे. 2005 पेक्षाही गंभीर परिस्थिती चिपळून शहरात निर्माण झाली आहे. संपूर्ण शहरात पुराचे पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत. परिस्थिती गंभीर होत असल्याने चिपळून नगरपरिषदेने बचावकार्यास सुरुवात केली आहे. तर पुण्याहून एनडीआरएफच्या 2 तुकड्या रत्नागिरीसाठी रवाना झाल्या आहेत.
काही ठिकाणी पाच फुटांपेक्षा जास्त पाणी -
बुधवारी दुपारपासून रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर चिपळून शहर सध्या पाण्यात आहे. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड, चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड , भोगाळे ,परशूराम नगर परिसरात पाणी वाढत आहे. काही ठिकाणी पाच फुटांपेक्षा जास्त पाणी आहे.. तर खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे.