रत्नागिरी -जिल्ह्याला निर्बंधतातून शिथिलता देण्यास तत्वतः मान्यता मिळाली असून बुधवारी यावर अंतिम निर्णय होईल. अशी दिलासादायक माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार राजन साळवी हेदेखील उपस्थित होते.
निर्बंधामध्ये मिळणार शिथिलता -
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. हा रेट ८.६१ टक्के एवढा खाली आला आहे. तसेच ६० टक्के ऑक्सिजन बेड रिकामे असल्याने जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात सामावेश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्याबाबत सोमवारी झालेली बैठकीत तत्वतः मान्यता मिळाली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी यावर निर्णय घेतील. कशात किती सवलत दिली जाईल हे जिल्हाधिकारी जाहीर करतील, अशी दिलासादायक माहिती उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली. मात्र निर्बंध शिथिल केले आणि बाधितांची संख्या वाढली तर पुन्हा निर्बंध लादावे लागतील. त्यामुळे नागरिकांनी प्रादूर्भाव रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.