रत्नागिरी - जिल्हा शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी जबरदस्तीने मृतदेह अतिदक्षता विभागातून उचलून नेत या रुग्णावर अंत्यसंस्कार केल्याची घटना समोर आली आहे. या रुग्णाचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, याबाबत तक्रार करणार असून, असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पोलीस फाटाही मागविण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे यांनी दिली आहे.
रत्नागिरी शहरातील राजीवडा येथील एका कोरोना संशयित रुग्णावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय म्हणजेच कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना अतिदक्षता विभागात या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही माहिती नातेवाईकांना समताच त्यांनी गैरसमजातून अतिदक्षाता विभागात जावून या रूग्णाचा मृतदेह ताब्यात घेतला. रविवारी (दि. 26 जुलै) रात्री हा सर्व प्रकार घडला. यावेळी परिचारिका आणि वैद्यकीय अधिकार्यांनी याला विरोध केला. मात्र, या 25 ते 30 जणांच्या समूहाने या विरोधाला न जुमानत उलट या कर्मचाऱ्यांशीच हुज्जत घातली. आणि मृतदेह घेऊन गेले. पॉझिटिव्ह मृत रुग्णासाठी शासनाने ठरवून दिलेली प्रक्रिया पूर्ण न करताच नातेवाईक मृतदेह तसाच घेवून गेले. त्यानंतर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. दरम्यान, या रुग्णाचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.