रत्नागिरी- आंबेनळी घाटातील बस दुर्घटनेप्रकरणी रायगड पोलिसांनी न्यायालयात तपास थांबविण्याची परवानगी मागितली आहे. मात्र, मृतांच्या नातेवाईकांनी न्यायालयाला पोलीस तपास न थांबविण्याची मागणी केली आहे. तसेच अपघातातून वाचलेल्या प्रकाश सावंत देसाई यांची नार्कोटेस्ट चाचणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
प्रतिक्रिया देताना मृतांचे नातेवाईक गेल्या वर्षी जुलै महिन्यात आंबेनळी घाटाच्या दरीत बस कोसळून झालेल्या अपघातामध्ये, कोकण कृषी विद्यापीठातील २९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर प्रकाश सावंत देसाई हे जखमी झाले होते. मात्र, या प्रकरणी सावंत हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांनी आता सावंतांची नार्को चाचणी करण्याची मागणी केली आहे.
तत्पूर्वी, चालक प्रवीण भांबीड यांनी निष्काळजीपणे व हलगर्जीपणे गाडी चालविल्याने हा अपघात झाला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने हा गुन्हा केल्याचा पुरावा आहे. मात्र, बसचालक भांबीड याचा देखील या अपघातात मृत्यू झाला असल्याने पोलिसांनी न्यायालयाला तपास थांबविण्याची परवानगी मागितली आहे. या संदर्भात पोलिसांनी न्यायालयात परवानगी पत्र दाखल केले आहे.
मात्र पोलिसांचे परवानगी पत्र समोर येताच मृतांच्या परिवारातून नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या निर्णयाला मृतांच्या नातेवाईकांनी विरोध केला आहे. नातेवाईकांनी न्यायालयाला पोलीस तपास न थांबविण्याची विनंती केली आहे. तसेच त्यांनी न्यायालयाला अपघातातून वाचलेल्या सावंत देसाई याची नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली आहे.