महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिवरे धरण दुर्घटना : अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी - तिवरे धरण दुर्घटना

या घटनेत माझं पूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे, याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

तिवरे धरण दुर्घटना : अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी

By

Published : Jul 3, 2019, 8:42 AM IST

रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील धरण फुटल्याने 12 ते 15 घरे वाहून गेली आहेत. या दुर्घटनेमध्ये 24 जण बेपत्ता झाले आहेत. मात्र, या दुर्घटनेला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचा आरोप या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. कारण गेली २ वर्षे या धरणाला गळती लागली होती. याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, केवळ मलमपट्टी या गळतीवर करण्यात आली. त्यामुळे या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे.

तिवरे धरण दुर्घटना : अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी

या घटनेला स्थानिकांनी प्रशासनाला जबाबदार घरले आहे. आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनही पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्री ९ च्या दरम्यान आमची माणसं जेवायला बसली होती, ती तशीच वाहून गेली. यामध्ये माझे वडील आणि चुलत्यांचा समावेश असल्याचे तानाजीराव चव्हाण यांनी सांगितले. या घटनेत माझं पूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे, याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
तिवरे भेंदवाडीतील काही घरे पाण्याखाली गेली आहेत. ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे, सती, गाणे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तिवरे धरण फुटल्याने नजीकचा दादर पूलही पाण्याखाली गेला. प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

काय आहे घटना -
मुंबईसह कोकणच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत होता. सह्याद्री खोऱ्यामध्येही पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यात तिवरे गाव चिपळूण तालुक्याच्या एका टोकाला आहे. तसा हा भाग दुर्गम आहे. या तिवरे गावात बांधण्यात आलेले धरण 2000 साली पूर्णत्वास गेले होते. या धरणाच्या पाण्याची पूर्ण संचय पातळी 139 मीटर आहे. या धरणाच्या पाणी साठ्याची एकूण क्षमता 2.45 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. या धरणातील पाण्याचा दसपटीतील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीला उपयोग होत होता. प्रशासनाच्या 2 जुलैच्या अव्हालानुसार हे धरण 27.59 टक्के भरलं होते. एकूण 131 मीटर पाणीपातळी धरणात होती.दरम्यान या धरणाला दोन वर्षांपूर्वी गळती लागली होती. गेल्यावर्षी या गळतीत वाढ झाली होती. या गळतीमुळे धरणाच्या मुख्य दरवाज्याशेजारी भगदाड पडले होते. याची वेळेत दुरुस्ती करण्याची मागणीही करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या तक्रारी नंतर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून गेल्यावर्षी या धरणाची संयुक्त पाहणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही धरणाच्या दुरुस्तीला काही वेग आला नव्हता. पावसाळ्यापूर्वी धरणाची दुरुस्ती न झाल्यास पावसाळ्यात धरणाला धोका पोचण्याचा शक्यताही वर्तविण्यात येत होती.

ABOUT THE AUTHOR

...view details