रत्नागिरी- मुंबईसह परजिल्ह्यातून रत्नागिरीमध्ये परतण्यासाठी स्वाभाविकपणे अनेक नागरिक आतुर आहेत. कोरोनाग्रस्त भागातून बाहेर गावाहून रत्नागिरीत येणाऱ्याची संख्या मोठी आहे. अशा नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढण्याची संभाव्यता आहे. त्यामुळे, पूर्व नियोजन आणि यंत्रणा उभारूनच कोकणवासियांना परजिल्ह्यातून रत्नागिरीत आणण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.
बाहेरुन रत्नागिरीत येणाऱ्यांसाठी पूर्व नियोजन करुन यंत्रणा उभारावी - भाजप जिल्हाध्यक्ष - ratnagiri corona news
बाहेरच्या जिल्ह्यातून घरी परतणाऱ्यांना प्रतिबंध करावा ही भूमिका नाही. मात्र व्यवस्था, सुविधा या प्रथम निर्माण कराव्यात.
दरम्यान कोरोनाग्रस्त भागातून येणाऱ्या नागरिकांची संख्या फार मोठी असू शकते, त्यांना संख्यात्मक क्वारंटाइन करण्याची व्यवस्था काय? वैद्यकीय तपासणीची व्यवस्था काय? त्यांचे रिपोर्ट मिरजला पाठवून रिपोर्ट येण्याची वाट पाहत बसणार की रत्नागिरीत कोरोना रिपोर्टसाठी सेंटर उभारले जाणार? मोठ्या संख्येने येणारे नागरिक पाहता कोरोनाचा धोका दुर्दैवाने वाढला तर उपलब्ध हॉस्पिटल्स, वैद्यकीय अधिकारी व व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडेल, त्या दृष्टीने अतिरिक्त व्यवस्था कराव्या लागतील. या सर्वांसदर्भात जिल्हा प्रशासनाने येथील जनतेला विश्वासात घ्यावे. अन्य जिल्ह्यातून घरी परतणाऱ्यांना प्रतिबंध करावा ही भूमिका नाही. मात्र व्यवस्था, सुविधा या प्रथम निर्माण कराव्यात. जिल्ह्यामध्ये कोरोना रिपोर्टचे सेंटर शासनाने उपलब्ध करून दिलेले नाही . रिपोर्टसाठी मिरजवर विसंबून राहावे लागते हे दुर्दैव आहे. लाखोंच्या संख्येने नागरिक स्वगृही परतण्यासाठी आतुर आहेत त्यांना परत आणण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय केवळ लोक अनुमती असू नये, तर सुरक्षिततेचे उपाय आणि व्यवस्था त्वरित उभी करून जनतेला त्याची स्पष्ट कल्पना देवून मगच कार्यान्वित व्हावे, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून दक्षिण रत्नागिरी भाजपा अध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.