रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी महिला रुग्णालयाची पाहणी केली. हे रुग्णालय सध्या कोविड रुग्णालय आहे. या रुग्णालयात बेडची संख्या वाढवण्यासाठी त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले या देखील उपस्थित होत्या.
ऑक्सिजन बेड वाढविण्यासाठी नियोजन
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, 200 बेडची क्षमता असलेलं हे रुग्णालय आपण गेल्यावर्षी तयार करून ठेवलं होतं. पण यावेळची कोरोनाची लाट मोठी आहे. जवळपास दुप्पट रुग्ण सापडत आहेत, आणि अजूनही रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिला रुग्णालयात बेडची संख्या वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या रुग्णालयामध्ये 160 ऑक्सिजन बेड वाढवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच शहराच्या बाहेर 300 बेडचं कोविड सेंटर उभारण्याचं नियोजन सुरू असल्याचेही ते यावेळी म्हणाले.