रत्नागिरी- सिंधुदुर्गत शिवसेना-भाजपमध्ये दुरावा निर्माण झाला असून, या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शिवसेनेला इशारा दिला आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन यांचा शिवसेनेला इशारा अन्य जिल्ह्यांतील विषय रत्नागिरीत आणून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर टीका होत असेल, तर ती आम्ही सहन करणार नाही, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन यांनी शिवसेनेला दिला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी आपण युतीने निवडणूक लढवत असल्याचे भान ठेवून भाजपच्या नेत्यांवर टीका करणे टाळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. भाजपचे कार्यकर्ते दुखावणार नाही, त्यांच्या भावनांचा अवमान होणार नाही याची दक्षता सेनेने घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
भाजप नेतृत्वावर टीका झाल्यास त्याचे गंभीर परिणाम प्रचारावर होतील, असा इशारा पटवर्धन यांनी दिला. भाजपचे कार्यकर्ते निष्ठावान असून, शिवसेनेने त्यांच्या नेतृत्वाचा मान राखलाच पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भाजप कार्यकर्ते युती असल्याने रत्नागिरीमध्ये एकही जागा भाजपला न मिळता ही मोठ्या मनाने युतीच्या प्रचारात सक्रीय आहेत मात्र त्यांच्या भावनांचा अवमान होणार असेल तर प्रचाराच्या सक्रीयेतबाबत पुनर्विचार करणार असल्याचे ते म्हणाले.
भाजपच्या नेत्यांवर टीका करून चांगले वातावरण बिघडवण्यापासून शिवसेनेने स्वतःला आवर घालावा. जिल्ह्यात नसलेला विषय याप्रचार सभांमध्ये आणू नये, असे पटवर्धन यांनी शिवसेनेला परखडपणे सांगितले आहे.