महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पणदेरी धरणाची गळती रोखण्यात प्रशासनाला यश; एनडीआरएफ दाखल ​ - ratnagiri rainfall news

पणदेरी धरणाला मंगळवारी गळती लागली होती. याबाबतची माहिती मिळताच प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती. दरम्यान प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी विसर्ग सांडव्याला सुरुंग लावून तो सांडवा फोडण्याचे काम करण्यात आले. यावेळी पाण्याचा विसर्ग अधिक प्रमाणात होवून कोणतीही जीवितहानी होऊ नये या करिता प्रशासनाकडून खबरादी घेण्यात आली आहे.

पणदेरी धरणाची गळती रोखण्यात प्रशासनाला यश
पणदेरी धरणाची गळती रोखण्यात प्रशासनाला यश

By

Published : Jul 8, 2021, 9:56 AM IST

Updated : Jul 8, 2021, 10:12 AM IST

रत्नागिरी- मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाला लागलेली गळती रोखण्यात प्रशासनाला अखेर यश आले आहे. पाटबंधारे विभागाच्या विविध पथकांनी याठिकाणी दिवसरात्र काम करून पाण्याची गळती थांबवली. तसेच धरणातील पाण्याची पातळी कमी करण्यासाठी कालवा व सांडव्यातून पाणी सोडण्यात आल्याने धरणावरील धोका तुर्तास टळला आहे. दरम्यान धरण गळतीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथून एनडीआरएफचे ५ तुकड्या धरण क्षेत्रात दाखल झाल्या आहेत. सारंग कुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ जवानांचे पथकही बुधवारी सकाळीच दाखल झाले आहे.

पणदेरी धरणाची गळती रोखण्यात प्रशासनाला यश

पणदेरी धरणाला मंगळवारी गळती लागली होती. याबाबतची माहिती मिळताच प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती. दरम्यान प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी विसर्ग सांडव्याला सुरुंग लावून तो सांडवा फोडण्याचे काम करण्यात आले. यावेळी पाण्याचा विसर्ग अधिक प्रमाणात होवून कोणतीही जीवितहानी होऊ नये या करिता पणदेरी बहिरीवली कोंडगाव या परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, शेतीची कामे करण्यास जावू नये, अशा सूचना देत बाजारपेठ बंद केली होती. पावसाची कृपा दृष्टी राहिल्यास पुढील आठ दिवसांत गळतीच्या ठिकाणी पिचिंगचे काम पूर्ण करता येणार असल्याची माहिती उपअभियंता गोविंद श्रीमंगले यांनी दिली.

पणदेरी धरणाची गळती रोखण्यात प्रशासनाला यश



अधिकारी, लोकप्रतिनिधींकडून पाहणी

मंगळवारी सायंकाळी उशीरा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. बुधवारी सकाळपासून आमदार योगेश कदम व जिल्हाधिकारी मिश्रा हे पणदेरी धरणावर हजर होते. दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांनीही धरणाला भेट देऊन पाहणी केली. तिवरे धरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे संभाव्य धोका टाळता आले असल्याचं सामंत यावेळी म्हणाले.

पणदेरी धरणाची गळती रोखण्यात प्रशासनाला यश
गळती बंद करण्यास प्रशासनाला अखेर यश-पणदेरी धरणला लागलेली गळती बंद करण्यास प्रशासनाला दोन दिवसांच्या अथक प्रयत्ननंतर यश आले आहे. दरम्यानच्या काळात पाण्याचा विसर्ग करण्यासाठी सांडव्याची भिंत ५ मीटर रुंद व दीड मीटर उंची फोडण्यात आली. त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने मुख्य भिंतीला लागलेली गळती बुजवण्याच्या कामाला वेग आला. तसेच मुख्य भिंतीवर येणारा पाण्याचा दाब कमी होण्यास मदत झाली. या सर्व घडामोडी चालू असताना गळती लागलेल्या ठिकाणी सिमेंटच्या रिकाम्या पोत्यातून माती भरून त्या गोण्या गळती ठिकाणी भरण्यात आल्या. आतापर्यंत सुमारे ७० ते ८० ट्रक मातीचा भराव करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य भिंतीला लागलेली गळती थांबल्याचे चित्र दिसून आले. यानंतर कोल्हापूर येथून आलेल्या मेकॅनिकल विभागाच्या पथकाने कालव्याची पाहणी केली आणि कालव्याद्वारे पाणी सोडण्यास टेक्निकल बाबींची पडताळणी करून कालव्याच्या दरवाजा पहिल्या टप्प्यात काही अंशी उघडण्यात आला. कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

धरण पूर्णपणे रिकामे करणार-

दरवाजा उघडताना गळतीमुळे धरणाच्या भिंतीला धोका उद्भवणार नाही याची निरीक्षणाने खात्री करण्यात आली. त्यानंतर दुपारी हा दरवाजा ७५ टक्के खुला करण्यात आला. दोन्ही बाजूनी पाण्याचा विसर्ग २ क्यूब प्रतिसेकंद अशा मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा जलदगतीने कमी होत असल्याने धरणाच्या मुख्य भिंतीतील गळती थांबून धोका कमी झाला आहे. धरणातून विसर्ग होणारे सांडवा व कालव्याचे मुख्य दरवाजे खुलेच ठेवण्यात येणार असून धरणातील पाणीसाठा पूर्णपणे रिकामा करण्यात येणार आहे.

एनडीआरएफ पथक दाखल-

धरणाला लागलेली गळती विचारात घेता; अचानक दुर्घटना घडून पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाकडून ग्राह्य धरण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून धरण परिसरात पुणे येथून एनडीआरएफच्या ५ तुकड्या दाखल झाल्या आहेत.

तिवरे धरण दुर्घटना-

जुलै २०१९ मध्ये चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची दुर्घटना घडली होती. याघटनेत १४ जणांचा मृत्यू झाला होता. धरणफुटीच्या या घटनेत भेंदवाडीतील काही घरे वाहून गेली होती. त्यामध्ये २३ जण बेपत्ता झाले होते. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने शोध मोहिम सुरू करत नागरिकांचे प्राण वाचविले होते.

Last Updated : Jul 8, 2021, 10:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details