रत्नागिरी - राज्यात येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहीता जाहिर होण्याची शक्यता आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता यंदाची निवडणुक हि नक्कीच चुरशीची असणार आहे. रत्नागिरीतील खेड-दापोली-मंडणगड विधानसभा मतदार संघात देखील निवडणूकीचे पडघम जोरदारपणे वाजू लागले आहेत.
दापोली विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? दापोली विधानसभा मतदारसंघाचा इतिहास
खेड-दापोली-मंडणगड हा भाग 1990 पासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 1990 पासून या भागात दोन्ही आमदार हे सातत्याने शिवसेनेचेच निवडून येत आहेत. मात्र 2009 मतदारसंघ पुनर्ररचनेत खेड मतदारसंघ संपुष्टात आला. खेडचा काही भाग गुहागर तर काही भाग हा दापोली मतदारसंघात जोडण्यात आला. मात्र तरीही नव्याने उदयास आलेल्या खेड-दापोली-मंडणगड मतदारसंघात 2009 साली सूर्यकांत दळवी यांनी बाजी मारली. तब्बल 5 वेळा दळवी आमदार म्हणून निवडून आले. मात्र 2014 मध्ये राष्ट्रवादीचे संजय कदम यांनी अनपेक्षितपणे बाजी मारली आणि दळवी यांची डबल हॅटट्रिक चुकली. तेव्हा आपला पराभव रामदास कदम यांच्यामुळेच झाल्याचे दळवी आजही जाहीरपणे सांगतात.
हेही वाचा... बाळापूर विधानसभा मतदारसंघ : भारिपचे सिरस्कार मारणार काय विजयाची हॅट्ट्रिक? विरोधकांनीही कसली कंबर
आगामी विधानसभेसाठी दापोलीतील समीकरणे काय असतील ?
गेली चार वर्ष रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. रामदास कदम यांनी योगेश कदम यांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हा मतदारसंघ भगवामय होईल आणि 100 टक्के विजय हा शिवसेनेचाच होईल असा विश्वास योगेश कदम यांना आहे. मात्र रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात घुसखोरी करू नये, ज्या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला त्या मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवावी. माझ्या मतदारसंघात मी आमदार नसलो तरी चालेल, पण या मतदारसंघातला आणि पक्षासाठी ज्याचे योगदान आहे असा उमेदवार कोणीही चालेल असा इशारा सूर्यकांत दळवी यांनी दिला आहे.
हेही वाचा... संगमनेर विधानसभा आढावा: विखे पाटील पाडणार थोरातांच्या बालेकिल्ल्याला खिंडार?
सध्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम हे पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. 2014 मध्ये भाजप-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढले होते. त्यात कदम-दळवी वादाचा फायदा संजय कदम यांना अप्रत्यक्षरीत्या झाला होता. मात्र यावेळी कांटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक आघाड्या सांभाळताना संजय कदम यांना कसरत करावी लागणार आहे. पण रामदास कदम आणि त्यांच्या मुलाचं पार्सल इथला सुज्ञ मतदार पुन्हा मुंबईत पाठवेल, त्यामुळे मला विजयाची खात्री असल्याचे विद्यमान आमदार संजय कदम यांचे म्हणणे आहे.
दापोली विधानसभा मतदारसंघ आढावा संजय कदम यांची जमेची बाजू
- संजय कदम यांचा ग्रामीण भागात चांगला संपर्क
- जनतेत चांगली प्रतिमा
- जनतेसाठी नेहमी धावून जाणारा नेता
- उत्तम वक्तृत्व आणि हजरजबाबीपणा
- सूर्यकांत दळवी यांच्या नाराजीचा फायदा होण्याची शक्यता
- खासदार सुनील तटकरे यांची भक्कम साथ
योगेश कदम यांची जमेची बाजू
- युवा नेतृत्व
- शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपुत्र म्हणून वेगळी ओळख
- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या खास मर्जीतील
- जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचार योगेश कदमांनी बाहेर काढला
- योगेश कदम उच्चशिक्षित
- मतदारसंघाची बांधणी करताना मतदारसंघ त्यांनी पुन्हा नव्याने बांधला
- राष्ट्रवादीत गेलेल्या अनेकांना त्यांनी पुन्हा शिवसेनेत आणले
- पर्यावरण मंत्र्यांच्या माध्यमातून कोट्यवधींची मतदारसंघात कामे
हेही वाचा... वेध विधानसभेचे : जळगाव शहर मतदारसंघ; युतीच्या तहात जागा भाजपला की सेनेला...मतदारांमध्ये उत्सुकता
दापोली मतदारसंघातील मतांचे गणित काय सांगत आहे ?
कोणी कितीही दावे केले तरी खरी मदार असणार आहे, ती कुणबी समाजाची एक गठ्ठा मते कोण घेणार यावरच, असे येथील जाणकारांचे म्हणने आहे. तसेच भाजपचीही भूमिका निर्णायक ठरणार आहे. कारण रामदास कदमांवर स्थानिक भाजपने नाराजीचा सूर आळवला आहे. त्यात दळवींची नाराजी त्यामुळे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना मुलगा योगेश कदम यांना निवडून आणताना कसरत करावी लागणार आहे. तर दुसरीकडे विद्यमान आमदार संजय कदम यांनाही एकाच वेळी अनेक आघाड्या सांभाळताना कसरत करावी लागणार एवढे मात्र नक्की.