रत्नागिरी -घरपट्टीच्या माध्यमातून कोट्यवधीचा महसुल रत्नागिरी नगरपालिकेला मिळतो. मात्र लॉकडाउनमुळे यावर्षी घरपट्टी वसुलीचा टक्का गतवर्षीच्या तुलनेत घसरला आहे. १४ कोटी १५ लाख वसुलीचे उद्दीष्ट पालिकेसमोर होते. परंतु केवळ ५ कोटी ९९ लाख रुपये वसूली झाली आहे.
शहरात सुमारे २७ हजार ७२९ इमलेधारक आहेत. पालिकेकडून विविध करांसह दरवर्षी घरपट्टी वसूल केली जाते. घराच्या स्क्वेअर फुटावर पालिका मालमत्ता विभागाचे कर्मचारी सर्व्हे करून घरपट्टी निश्चित करतात. त्यानुसार गेल्यावर्षी २०१८-१९ मध्ये ९ कोटी ८९ लाख रुपये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ६ कोटी ४१ लाख वसूल झाले होते. सुमारे ८०.११ टक्के वसुली झाली होती. अनेक इमलेधारकांनी घरपट्टी थकविली आहे. त्यांच्यावर पालिकेने कारवाई केली आहे. काही थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध केली होती. काहींच्या घराला सील ठोकली होती. गेल्यावर्षीची थकबाकी आणि यंदाची घरपट्टी धरून १४ कोटी १५ लाखाची वसुलीचे उद्दिष्ट पालिकेसमोर आहे.