रत्नागिरी - येथील रत्नागिरी नगर परिषदेतील नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत मनसेदेखील दंड थोपटून मैदानात उतरली आहे. इतर प्रमुख पक्षांकडून प्रचाराची राळ उठवली जात असताना मनसेकडून वैयक्तीक गाठीभेटी आणि घरोघरी प्रचारावर भर देण्यात आला आहे. या निवडणुकीत मनसे आपला जलवा दाखविला, असा विश्वास मनसेच्या कार्यकर्त्यांना आहे.
रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत मनसे शक्तीनिशी मैदानात हेही वाचा-संतापजनक! जेवणाच्या ताटात मटण कमी वाढले म्हणून पत्नीला जिवंत जाळले
राहुल पंडीत यांनी राजीनामा दिल्याने नगराध्यक्षपदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या पोटनिवडणुकीत सेना आणि भाजप आमनेसामने असल्याने रंगत आली असली तरी मनसेने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ही निवडणूक चौरंगी झाली आहे. मनसेकडून अनुभवी आणि खंदे पदाधिकारी रूपेश सावंत यांच्या रूपाने तुल्यबळ उमेदवार नगराध्यक्ष पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आला आहे. रूपेश सावंत यांना असलेला शहराचा अभ्यास याचा फायदा मनसेच्या उमेदवाराला होईल, असा राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरून तीन ते चार दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर प्रचाराला अधिक रंगत आली आहे. प्रमुख पक्षांकडून प्रचार बैठकांचा धडाका सुरू असताना मनसेकडून छुप्या रणनीतीचा वापर सुरू आहे. वैयक्तीक गाठीभेटी आणि घरोघरी प्रचार यावर मनसेकडून भर देण्यात आला आहे. तरूण वर्गाचा मनसेच्या प्रचारात मोठा प्रतिसाद आहे. येणारी निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवण्याचा निर्णय मनसेकडून घेण्यात आला आहे. येणाऱ्या दोन वर्षात नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून कोणकोणती विकासकामे पक्षाच्या माध्यमातून करणार यावर प्रचारा दरम्यान भर दिला जात आहे. यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीत मनसेच्या रूपेश सावंत यांचे तगडे आव्हान सर्वच पक्षांसमोर असणार आहे.