रत्नागिरी- लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. पहिल्यांदाच झालेल्या नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत शिवसेनेचे मनोहर बाईत हे 3,546 मतं घेत विजयी झाले. तर, काँग्रेसचे उमेदवार राजेश राणे यांना 2,929 मतं मिळाली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवार संपदा वाघदरे या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या, त्यांना 1,563 मतं मिळाली.
लांजा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेची बाजी, नगराध्यक्षपदी मनोहर बाईत! लांजा नगरपंचायतीच्या 17 नगरसेवकांपैकी मधुरा बापेरकर या बिनविरोध निवडून आल्याने 16 जागांसाठी गुरुवारी मतदान झालं. या 16 पैकी शिवसेनेचे 9 उमेदवार विजयी झाले. तर भाजपचे 3, काँग्रेसचे 2 आणि 2 अपक्ष उमेदवार विजयी झाले. गुरुवारी झालेल्या या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी 73 टक्के मतदान झालं.
आज (शुक्रवार) सांस्कृतिक भवनात सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मात्र यावेळी मतदारांनी शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिले. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने याठिकाणी आघाडी करूनही त्यांना म्हणावे तसे यश संपादन करता आले नाही. तसेच भाजपनेही याठिकाणी चांगली ताकद लावली होती, मात्र त्यांनाही 3 जागांव्यतिरिक्त फार यश मिळालं नाही.
मागच्या वेळी या जागेवर शिवसेना अगदी काठावर पास झाली होती. मात्र, यावेळी शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवत विजय संपादित केला. एक हाती सत्ता आल्यानंतर लांज्यात शिवसेनेच्या कार्यकत्यांनी एकच जल्लोष केला. या निवडणुकीमध्ये शिवसेना खा. विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, संपर्कप्रमुख सुधीरभाऊ मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, प्रसिद्ध उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांनी मेहनत घेतली. या विजयाबद्दल जिल्हाप्रमुख विलास चाळके आणि आमदार राजन साळवी यांनी मतदारांचे आभार मानले.
हेही वाचा : अजित पवारांच्या सत्काराला अवघी बारामती; मात्र सुप्रियांसह रोहित पवार अनुपस्थितच