तेजपूर (आसाम)/रत्नागिरी : अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरच्या फॉरवर्ड भागात बर्फवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात अडकून भारतीय लष्कराचे एक जवान शहीद झाले. सुभेदार अजय शांताराम ढगळे (३६) असे शहीद जवानाचे नाव असून, ते मूळचे रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील मोरवणे ढवळेवाडी येथील आहेत. चीन सिमेलगत रस्त्याची रेकी करण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी दरड कोसळून त्यांचा मृत्यू झाला. शहीद ढगळे यांचे पार्थिव सोमवारी त्यांच्या मूळ गावी आणले जाण्याची शक्यता असून उद्या त्यांच्यावर मोरवणे येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अत्यसंस्कार केले जाणार आहेत.
27 मार्च रोजी भूस्खलनात सापडले : चीन सीमेलगतच्या तवांग भागात दरवर्षी या हंगामात बर्फ वितळतो. यावेळी येथे रस्ता तयार करण्यासाठी रेकी केली जाते. या कामासाठी सुभेदार अजय ढगळे अन्य जवानांसह गेले होते. 24 मार्च पासून या भागात सतत पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे भूस्खलनही मोठ्या प्रमाणात झाले आहे. 27 मार्च रोजी सकाळी रेकी करण्यास गेलेले जवान या भूस्खलनात सापडले. त्या दिवसापासून हे जवान बेपत्ता होते.