रत्नागिरी- ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रत्नागिरीतील विशेष कारागृहाच्या सुरक्षेवर सध्या प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विशेष कारागृहात शिक्षा भोगत असलेले कैदी घरकामासाठी जुंपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ८ दिवसांपूर्वीच एक कैदी या कारागृहातून पळून गेला होता. त्यामुळे कारागृहाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.
कारागृह कर्मचाऱ्यांच्या घर कामासाठी चक्क कैद्यांना जुंपले, रत्नागिरीतील धक्कादायक घटना - prisnors
कारागृहातील एका कर्मचाऱ्याच्या घरातील सामान ट्रकमध्ये भरण्यासाठी काही कैदी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या कारागृह कर्मचारी वसाहती बाहेर आणले होते.
कारागृहातील एका कर्मचाऱ्याच्या घरातील सामान ट्रकमध्ये भरण्यासाठी काही कैदी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या कारागृह कर्मचारी वसाहती बाहेर आणले होते. मोकळ्या वातावरणात आलेल्या या कैद्यांना आपण कैदी असल्याचा विसरच पडला होता. तर वर्दीवर असलेले पोलीस मुख्य रस्त्यावर ट्रक उभा करून कैद्यांकरवी सामान ट्रकमध्ये भरून घेताना अनेकांनी पाहिले. आमचे कुणी काही करू शकत नाही, अशा अविर्भावात कारागृह पोलीस कसलीही भीती न बाळगता खुलेआम कैद्यांना घेऊन वावरत होते, अशी सूट मिळाल्याने कैदी पळून जाण्याची भीती आहे.
आठ दिवसांपूर्वी याच कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला रुपेश कुंभार नामक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता. या प्रकारानंतर कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या घटनेला ८ दिवस होत नाहीत तोच, एका कर्मचाऱ्याच्या घरातील सामान हलविण्याकरीता चक्क कारागृहातील कैद्यांचा हमाल म्हणून वापर करण्यात आला. त्यामुळे तुरुंग प्रशासन नेमके काय करत आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करू, अशी प्रतिक्रिया कारागृह अधीक्षक आर. आर देशमुख यांनी दिली आहे.