महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 8, 2020, 4:24 PM IST

ETV Bharat / state

जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना रोखा; आएमएचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात आल्यास आणखी मोठे संकट उभे राहिल, अशी भिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या(आयएमए) रत्नागिरी शाखेने व्यक्त केली आहे.

travelers
प्रवासी

रत्नागिरी -जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांची नव्याने भर पडत आहे. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात आल्यास आणखी मोठे संकट उभे राहिल, अशी भिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या(आयएमए) रत्नागिरी शाखेने व्यक्त केली आहे. सध्याच्या परिस्थितीत गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर त्याचा ताण वाढण्याची शक्यता आहे. चाकरमान्यांना जिल्ह्यात येण्यापासून रोखण्यात यावे, असे निवेदन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेने जिल्हाधिकाऱयांना दिले.

जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना रोखा अन्यथा मोठे संकट उभे राहिल

'गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणासाठी चाकरमानी कोकणात येण्याची खूप जुनी परंपरा आहे. त्यामुळे सध्या हजारो लोक रत्नागिरीत दाखल होत आहेत. सध्या शासकीय रुग्णालयामध्ये कर्मचारी व डॉक्टरांची प्रचंड कमतरता आहे. परिणामी आएमएचे खासगी डॉक्टर रत्नागिरी शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन आपली सेवा देत आहेत. आयएमए संघटनेचे अस्थिरोग तज्ञ, फिजिशियन, रेडियोलॉजिस्ट आणि भूलतज्ञ शासकीय रुग्णालयातील कोविड रुग्णांना विना मोबदला सेवा देत आहेत. मात्र, रत्नागिरी शासकीय रुग्णालयावरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आयएमएचे काही डॉक्टर सदस्य सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. परिणामी आमच्यावरील ताण सुध्दा दिवसेंदिवस वाढत चालला आहे,' या निवेदनात म्हटले आहे.

वरील परिस्थितीमध्ये जर गणपतीला लाखो चाकरमानी रत्नागिरीत आले तर रूग्ण संख्येत भरमसाठ वाढ होईल आणि कोविडचा भडका उडेल. दिवसेंदिवस डॉक्टरांचेही कोविड पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढत जाईल. परिणामी मोठे संकट उभे राहून जिल्ह्याच्या वैद्यकीय यंत्रणेचा कणा मोडेल. त्यामुळे महानगरातील चाकरमान्यांना जिल्ह्यात येण्यापासून रोखावे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेने केली. या निवेदनावर डॉ. निनाद नाफडे, डॉ. नितीन चव्हाण, डॉ. निलेश नाफडे या पदाधिकार्‍यांच्या सह्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details