रत्नागिरीGram Panchayat Election Result : राजापूर मतदार संघात लांजा तालुक्यात पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या पदाधिकार्यांनी पोटनिवडणुकीत बाजी मारत ठाकरे गटाच्या आमदारांना शह दिला आहे. दापोलीत आमदार योगेश कदम यांच्यावर मतदारांनी विश्वास दाखवला आहे.
सहा गावात बिनविरोध निवडणुका : जिल्ह्यात 16 गावांमध्ये सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील सहा गावांमध्ये निवडणुका बिनविरोध झाल्यामुळं 10 गावांमध्ये मतदान झाले होते. या ठिकाणी कोणाचे वर्चस्व राहणार याकडं लक्ष लागून राहिलं होतं. दापोलीमध्ये कवडोली, मांदिवली, बांधतिवरे व डौली या चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यातील डौली सरपंचपदी हरिश्चंद्र महाडीक, कवडोली सरपंचपदी प्रदीप चिंचघरकर हे विजयी झाले आहेत, तर बांधतिवरे आणि मांदिवली सरपंचपदी रिक्त असले तरी सदस्य हे योगेश कदम यांच्या विचारांचे आहेत. या सर्व विजयी उमेदवारांचे शिवसेना तालुकाप्रमुख उन्मेष राजे व पदाधिकार्यांनी अभिनंदन केले.
यांनी मारली बाजी: मंडणगडमध्ये दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यात उन्हवरेमध्ये गावपॅनल विजयी झाले आहे. यात दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी दावा केला आहे. तर वाल्मिकीनगर ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाने दावा केला आहे. चिपळूण तालुक्यात अजितदादा गटाचे आमदार शेखर निकम यांनी तीनही ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले आहे. टेरवमध्ये किशोर कदम यांनी सरपंचपदी विजय मिळवला आहे. शरद पवार गटाचे चिपळुणातील नेते माजी आमदार रमेश कदम यांचे स्वीयसहाय्यक राहिलेल्या किशोर कदम यांनी या ठिकाणी बाजी मारली. कालुस्ते खु. व कालुस्ते बु. या दोन्ही ग्रामपंचायतीवर आ. निकम यांच्या सहकार्यांनी बाजी मारली.
भाजपाने मारली मुसंडी : संगमेश्वरमध्ये तळेकांटे ग्रामपंचायतीवर भाजपाच्या सुषमा बने यांनी विजय मिळवला. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाने मारलेली मुसंडी लक्षवेधी ठरली आहे. लांजामध्ये दोन गावांमध्ये पोटनिवडणुका झाल्या. याठिकाणी पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकार्यांनी बाजी मारत ठाकरे गटाला धक्का दिला. राजापूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने वर्चस्व राखले आहे. जुवे जैतापूर ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली. परंतु या ग्रामपंचायतीवर राजन साळवी यांनी दावा केला आहे.
हेही वाचा -
- Gram Panchayat Result 2023 : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपाचं वर्चस्व; ६० पैकी २४ ग्रामपंचायतींवर कब्जा
- Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायतीत घवघवीत यश; महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
- Gram Panchayat Result २०२३ : काटेवाडी ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा अजित पवार गटाचे वर्चस्व; मात्र दोन जागी भाजपा विजयी