रत्नागिरी -प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि साधारण 42 बालकांना कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर काढणारे डॉ. दिलीप मोरे यांचे आज (गुरुवार) पहाटे निधन झाले. गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून ओळख असणाऱ्या आणी सेवानिवृत्तीनंतरही सेवा बजावत बजावणाऱ्या डॉ. दिलीप मोरे यांना काही दिवसांपूर्वीच कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे त्यांची प्राणज्योत माळवली. ही बातमी कानी पडताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
'माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आमच्या घरांच्याची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली. माझ्या 6 वर्षाच्या मुलीचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, देवदूत डॉ. दिलीप मोरे हे कोरोना पॉझिटिव्ह मुलांवर उपचार करत असल्याने मला कोणतीही चिंता नव्हती. जिल्हा रुग्णालयातच माझ्या मुलीने कोरोनावर मात केली. यात डॉ. दिलीप मोरे यांचे योगदान मोठे आहे. पण डॉ. दिलीप मोरे यांनी रुग्णसेवा करताना स्वतःच्या जीवाची पर्वा कधी केली नाही. त्यामुळेच कदाचित आजचा दिवस आपल्याला पहावा लागला. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. प्रतीक झिमण यांनी डॉ. दिलीप मोरे यांच्या निधनानंतर व्यक्त केली आहे.
हेही वाचा -नागपूरमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
डॉ. दिलीप मोरे 11 फेब्रुवारी 1981 रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. जवळपास 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मार्च 2013 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. या कालावधीत बालरोगतज्ज्ञ म्हणून आपल्या कार्याचा त्यांनी वेगळा ठसा उमटवला होता. शिवाय जिल्हा रुग्णालयातील बालविभाग हा त्यांच्यामुळेच ओळखला जायचा. लहान मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम ते या विभागात राबवायचे. डॉ मोरेंनी आपल्या मुलाला तपासले आहे ना, मग आपले मुल हमखास बरे होणार हा विश्वास डॉ. मोरेंकडे आजारी मुलांना घेऊन येणाऱ्या पालकांना असायचा. रुग्णसेवा करत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली होती. समाजातील प्रत्येक घटकाबरोबर ते मिळून मिसळून वागत. रुग्णसेवा करताना त्यांनी कधी भेदभाव केला नाही.