रत्नागिरी -अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचे रुपांतर निसर्ग चक्रीवादळात झाले आहे. हे वादळ हळूहळू कोकण किनारपट्टीकडे सरकत असून मुंबईसह किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांना या निसर्ग चक्रीवादळाचा धोका आहे. हवामान विभागाने जिल्हा प्रशासनांना याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यानुसार प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. ज्या बोटी मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेल्या होत्या त्यांना माघारी बोलावण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे(एनडीआरएफ) 26 जणांचे एक पथक चिपळूण येथे दाखल झाले आहे.
रत्नागिरीतील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...
निसर्ग चक्रीवादळाचा धोका; रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. त्यानुसार वादळाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. 3 जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवर वादळाचे पडसाद दिसून येतील. या काळात ताशी 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात तयार झालेले वादळ महाराष्ट्रासह गुजरातच्या किनारपट्टीवर 3 जूनला धडकेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
पुढील सुचना मिळूपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये आणि किनारपट्टीवरील नागरिकांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. एनडीआरएफच्या 26 जवानांचे पथक चिपळूण येथे ठेवण्यात आले आहे. या पथकातील अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे.