महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दापोली, मंडणगडमधील शिवसेनेचे अंतर्गत राजकारण पेटले; कारवाई झालेले शिवसेना पदाधिकारी आक्रमक - दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणूक

नगर पंचायत निवडणुकीच्यानिमित्ताने दापोली, मंडणगडमधील वातावरण अधिकच रंगतदार होऊ लागले आहे. पालकमंत्री अनिल परब आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यातील वाद विकोपाला गेल्याची चर्चा आहे. आमदार योगेश कदमांना डावलून एबी फॉर्म देण्यात आल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.

Ratnagiri
रत्नागिरी

By

Published : Dec 17, 2021, 12:50 PM IST

रत्नागिरी -जिल्ह्यातील दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत (Dapoli Nagar Panchayat Election ) शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडी जाहीर करण्यात आली. नगर पंचायत निवडणुकीच्यानिमित्ताने दापोली, मंडणगडमधील वातावरण अधिकच रंगतदार होऊ लागले आहे. पालकमंत्री अनिल परब आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यातील वाद विकोपाला (Ramdas Kadam Vs Anil Parab) गेल्याची चर्चा आहे. कथित ऑडिओ क्लिपनंतर रामदास कदम यांना डावलण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. आमदार योगेश कदमांना डावलून एबी फॉर्म देण्यात आल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.

शिवसेनेचे अंतर्गत राजकारण पेटले

दापोली व मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाली आहे. शिवसेनेने या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर दिली आहे. परब यांनी शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. स्वतः परब सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. दापोली मंडणगडमधील शिवसेना संपवण्याचा कुटील डाव सूर्यकांत दळवी आणि राष्ट्रवादीला हाताशी धरून पालकमंत्री अनिल परब रचत असल्याची प्रतिक्रिया मंडणगडमधील तालुकाप्रमुख, शहरप्रमुखांनी दिली आहे.

शिवसेना कार्यकर्ते आक्रमक -

सूर्यकांत दळवी हे गेली काही वर्षे सक्रिय राजकारणात नव्हते, कधी ते भाजपामध्ये जाणार, राष्ट्रवादीत जाणार अशाही बातम्या येत होत्या. एकीकडे सूर्यकांत दळवी यांच्यावर जबाबदारी तर दुसरीकडे राष्ट्रवादीशी आघाडी झाल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. नाराज शिवसैनिकांनी निवडणुकीत अपक्ष फॉर्म भरले आहेत. त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई करत दोन्ही तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना पदावरून काढून टाकण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री अनिल परब यांनी केली होती.

याबाबत बोलताना कारवाई झालेले मंडणगडचे शहरप्रमुख विनोद जाधव म्हणाले की, पालकमंत्री अनिल परब हे यापूर्वी होते कुठे? पालकमंत्री झाल्यापासून ते मंडणगडमध्ये फिरकले नाहीत, वादळ असो वा कोरोना काळ पालकमंत्री होते कुठे? मंडणगडमधील शिवसेना संपवण्याचा कुटील डाव पालकमंत्री राष्ट्रवादीला हाताशी धरून करत आहेत, असा आरोप कारवाई झालेल्या जाधव यांनी केला आहे.
तसेच शिवसेना पक्षात राहून शिवसेनेशी बंडखोरी केलेल्या सूर्यकांत दळवी यांना हाताशी धरून शिवसेना संपविण्याचा डाव रचण्यात आला आहे. इथली शिवसेना राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा काम शिवसेनेचे नेते करताहेत. ज्या सूर्यकांत दळवी यांनी त्यांच्या माणसांना सोबत घेऊन शिवसेनेच्या उमेदवारांना पाडण्याचं काम केलं, अशा लोकांना घेऊन शिवसेना वाढविण्याचं काम चाललं आहे की संपवण्याचं काम चाललं आहे, असा सवाल मंडणगडचे कारवाई झालेलं तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details