महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता विना परवाना वाहनचालकांऐवजी पालकांवर होणार कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - rules

रस्ते सुरक्षा समितीची त्रैमासिक सभा जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली.

बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी

By

Published : May 8, 2019, 2:35 PM IST

रत्नागिरी - वाहतूक नियमांची पायमल्ली करून विना परवाना वाहन चालविणाऱ्या युवक-युवतींऐवजी त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रस्ते सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत दिले. वाहन चालविण्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण असताना १५ ते १८ वर्षांच्या आतील युवक-युवती मोठ्या प्रमाणावर वाहने चालवतात. यामुळे अपघात घडण्याची शक्यता असते. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

रस्ते सुरक्षा समितीची त्रैमासिक सभा जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या सभेला रत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, समिती सदस्य पोलीस निरीक्षक डी. के. पाटील, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, एस. टी. चे विभाग नियंत्रक दिवटे, वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक, बांधकाम विभागाचे दौलत मयेकर, शहर अभियंता गौतम भगत व नगर पालिका प्रशासन अधिकारी शिल्पा नाईक आदींची उपस्थिती होती.

बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी
शहरातील वाहतूकीस शिस्त लागावी यासाठी चौकांमध्ये रम्बलर्स आणि झेब्रा क्रॉसिंग लावण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. रस्त्यांवरून वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना त्यांचा वाहन परवाना निलंबित करणे तसेच भविष्यकाळात दंडासोबतच परवान्यासाठी कायमस्वरुपी अपात्र ठरविणे आदी कारवाई आवश्यक झाली आहे. यानुसार वाहतूक शाखेने कामकाज करावे, असे ते म्हणाले. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्यांवर यापूर्वी २०० रुपये दंडाची कारवाई करण्यात येत होती. आता नव्या बदलानुसार हा दंड ५०० रुपये भरावा लागेल, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. शहरातील रस्त्यात अस्ताव्यस्त वाहनांचे पार्किंग करणाऱ्या वाहनांवर जॅमर्स लावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सभेत दिल्या.येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावर योग्य ते साईनबोर्ड लावून अपघात टाळण्याची जबाबदारी रस्त्याच्या कंत्राटदारांवर आहे. यात कसूर करणाऱ्या कंत्राटदारांवर थेट कारवाई करा व गुन्हे नोंदवा, असेही आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details