रत्नागिरी - जिल्ह्याला आज निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. वादळी वाऱयांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे रस्ते बंद झाले. पडलेली झाडे हटवून रस्ते मोकळे करण्याचे काम प्रशासकीय यंत्रणा करत आहे. या कामात जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा आणि पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्वतः सहभाग घेतला. रस्त्यावर पडलेली झाडे मशीनने कटकरून रस्ते मोकळे करण्याचे काम त्यांनी केले.
आज पहाटेपासूनच चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली होती. मात्र, या नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पूर्व तयारी करून ठेवली होती. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा हे स्वत: ओरीसामधील आहेत. त्यामुळे त्यांना अशा चक्रीवादळांची पूर्ण माहिती आहे. चक्रीवादळाची सूचना मिळताच संबंधित सर्व विभागांची एकत्रित बैठक घेवून त्यांनी कामाचे नियोजन करून दिले होते.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक स्वतः उतरले मदत कार्यात निसर्ग चक्रीवादळाचा फटका गुहागर, दापोली, मंडणगड या तालुक्यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा आणि पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे सर्व घडामोडींचा आज सकाळपासून आढावा घेत होते. अनेक ठिकाणी त्यांनी स्वतः जाऊन परिस्थितीची पाहणी केली होती.
वादळानंतर सर्व परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मेहनत घेत आहे. यादरम्यान जिल्हाधिकारी मिश्रा यांच्यासह पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मैदानात उतरुन प्रत्यक्षपणे मदत कार्यात सहभाग घेतला. दापोली-गुहागर रस्त्यावर पडलेली झाडे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी कटरच्या सहाय्याने कापून बाजूला केली. अशा कठीण परिस्थितीत स्वतः फिल्डवर जाऊन मदत कार्यात सहभाग घेणारे अधिकारी कमीच असतात. त्यामुळे मदतकार्यात सहभाग घेणाऱ्या या अधिकाऱ्यांचे जनतेतून कौतुक होत आहे.