रत्नागिरी - रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या चौरंगी लढतीत ४ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात कैद होणार आहे. या निवडणूकीत ५८ हजार ७७० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ३० हजार २३ स्त्री मतदार तर २८ हजार ७४६ पुरुष मतदार आहेत. शहरात एकूण ४९ मतदान केंद्र आहेत. यात सुमारे ३०० कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले आहेत.
राहुल पंडित यांच्या राजीनाम्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेची पोटनिवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक एकतर्फी होईल असे वाटत असतानाच सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने प्रचाराची धुळवड चांगलीच उडाली. गेल्या महिनाभर शहरात निवडणुकीचा ज्वर पहायला मिळाला. कुठे रोड शो, तर कुठे प्रभागवार बैठका तर काही ठिकाणी वैयक्तिक भेटी गाठी घेऊन प्रचार करण्यात आला. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि मनसे हे 4 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेनेचे प्रदीप उर्फ बंड्या साळवी, भाजपचे अॅड. दीपक पटवर्धन, राष्ट्रवादीचे मिलिंद कीर आणि मनसेचे रुपेश सावंत हे निवडणूक रिंगणात आहेत. या चौघांमध्ये ही लढत होणार आहे.