महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 18, 2019, 11:32 PM IST

Updated : Oct 18, 2019, 11:53 PM IST

ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्याकडे सर्वच पक्षाच्या मोठ्या नेत्यांची पाठ; एकही मोठी प्रचार सभा नाही

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आहे. येथे पाचही जागा युतीमध्ये शिवसेना लढवत आहे. आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे.मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात प्रचाराच्या रणधुमाळीत कुठल्याच राजकीय पक्षांनी एकही मोठी सभा  घेतलेली नाही.

संपादित छायाचित्र

रत्नागिरी - शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आहे. येथे पाचही जागा युतीमध्ये शिवसेना लढवत आहे. आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. पण एकीकडे राज्यात प्रचारासाठी विविध पक्ष रान उठवत असताना रत्नागिरी जिल्हा मात्र त्याला अपवाद ठरला आहे. जिल्ह्यात प्रचाराच्या रणधुमाळीत कुठल्याच राजकीय पक्षांनी एकही मोठी सभा घेतलेली नाही. त्यामुळे विधानसभेचे रणसंग्राम मोठ्या सभा शिवायच कोण मारणार याची चर्चा सध्या रंगली गेली आहे.

प्रमोद कोनकर, राजकीय विश्लेषक

जिल्ह्यात विधानसभेच्या पाच जागा आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत शिवसेनेची ताकद चांगली आहे. युतीच्या जागावाटपात या पाचही जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये 4 ठिकाणी राष्ट्रवादीचे तर एका ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार उभा आहे. अन्यही पक्षांचे काही उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, अद्याप कोणत्याच पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या सभा जिल्ह्यात झालेल्या नाहीत. प्रचार संपायला अवघा एक दिवस शिल्लक आहे. त्यामुळे आता मोठी सभा होईल याची शक्यता नाही

शिवसेनेची जिल्ह्यात मोठी ताकद आहे. त्यामुळे मोठ्या सभे ऐवजी स्थानिक पातळीवरील शिवसेनेकडून प्रचारावर भर असल्याचे चित्र आहे. शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत हे मतदारसंघामध्ये शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. शिवसेना नेते सुभाष देसाई हे सुद्धा जिल्ह्यात प्रचारासाठी येऊन गेले.

हेही वाचा - आघाडीच्या काळात मुंबईवर दहशतवादी हल्ले, बीकेसी येथील सभेत नरेंद्र मोदींची टीका

दुसरीकडे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येऊन गेले. तर राजापूरमध्ये काँग्रेस उमेदवार अविनाश लाड यांच्या प्रचारासाठी खासदार हुसेन दलवाई येऊन गेले. या पलीकडे अन्य नेता किंवा मोठ्या सभा जिल्ह्यात झालेल्या नाहीत. तर भाजपचा कोणताही मोठा नेता जिल्ह्यात फिरकलेला नाही. त्यामुळे एकूणच सर्वच पक्षाच्या बड्या नेत्यांनी जिल्ह्याकडे प्रचारासाठी पाठ फिरवलेली पहायला मिळत आहे. आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्या-त्या पक्षाचे स्टार प्रचारक किंवा दिग्गज नेते येतात. मात्र जिल्ह्यात कोणत्याच पक्षातील दिग्गज नेत्यांची सभा झालेली नाही. त्यामुळे निवडणूकीचे वातावरण तसे शांतच असल्याचं पहायला मिळत आहे.

हेही वाचा - भर पावसात शरद पवारांचे भाषण, म्हणाले- सातारा चमत्कार करणार !

दरम्यान याबाबत राजकीय विश्लेषक प्रमोद कोनकर यांना विचारले असता, येथे सर्वच पक्षांनी मतदारांना गृहीत धरलेले आहे. या शिवसेनेच्याच जागा आहेत असेच गृहीत धरल्यासारखी परिस्थिती आहे. तसेच मांडायला मुद्दे काहीच नाहीयेत, नाणार सारखा मुद्दा सुद्धा सर्वच पक्षांनी गृहीत धरलेला आहे. त्यात प्रचाराला कमी दिवस राहिलेले आहेत, दिवस कमी असताना मोठ्या सभांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा घरोघरी प्रचारावर भर देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मोठ्या सभांवर खर्च कशाला करावा, असाही एक विचार करण्यात आला असावा असं कोनकर यावेळी म्हणाले.

Last Updated : Oct 18, 2019, 11:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details