रत्नागिरी ( चिपळूण ) :राज ठाकरे यांनी चिपळूणमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आगामी काळात मनसेची राजकारणातील तयारी याबाबत मार्गदर्शन केले. राज्यात सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण जनतेला आवडत नाही, असे राजकारण आम्हालाही मान्य नाही, असे राज ठाकरे म्हणाले. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून त्यांचे कौतुक करणाऱ्या राज यांनी आज पहिल्यांदाच फडणवीस यांच्या भूमिकेवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची नक्कल : राज म्हणाले, काल एक मुलाखत पाहत होतो. तेव्हा देवेंद्र म्हणाले होते, मी राजकारणी आहे. राजकारणी म्हणून काही तडजोडी कराव्या लागतात. मात्र काँग्रेससोबत कधीही तडजोड करणार नाही. कारण काँग्रेस हा वेगळ्या विचारांचा पक्ष आहे. फडणवीस जर काँग्रेसला वेगळ्या विचारांचा पक्ष म्हणत असतील तर, राष्ट्रवादी कसल्या विचारांचा आहे? अशी टीका करत राज यांनी देवेंद्र फडणवीस यांची नक्कल केली.
संपत्ती खाणारे माझ्या पक्षात नको :राजकारण्यांनी कोकणात बक्कळ संपत्ती जमवली. प्रकल्पांच्या नावाखाली पैसा खाल्ला जातो. प्रकल्पाची जागा नाणार येथे होती, मग ती बारसू येथे कशी गेली? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. कोकण खाऊन संपत्ती जमा करणारी व्यक्ती मला माझ्या पक्षात नको आहे असे देखील ते म्हणाले.