महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 6, 2020, 4:27 PM IST

ETV Bharat / state

सलग 3 दिवस रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर ओसरला..!

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आज काहीशी विश्रांती घेतली आहे.

रत्नागिरीत पावसाची विश्रांती
रत्नागिरीत पावसाची विश्रांती

रत्नागिरी - जिल्ह्याला सलग तीन दिवस झोडपून काढल्यानंतर आज (गुरुवार) काहीशी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

सोमवारपासून रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस धो-धो बरसत होता. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली होती. तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गही बंद होत. तर बाजारपेठांमध्येही पाणी शिरले होते. मात्र, आज पावसाने काहीशी विश्रांती घेतली. तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसाचा जोर ओसरला होता. त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत होते.

दरम्यान, तब्बल 40 तासानंतर चांदेराई बाजारपेठेतील पाणी रात्री 11 वाजता कमी झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला. आज सकाळपासून बाजारपेठेतील दुकानदार आपल्या दुकानातील नुकसान झालेल्या वस्तू बाहेर काढून मोठ्या प्रमाणावर साठलेला चिखल काढत होते. महसूल खात्याने तत्काळ सर्व दुकानदार, व्यापारी आणि काही बाधित घरांचे पंचनामे करावेत, अशी मागणी स्थानिक सरपंचांनी केली आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 83.42 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. चिपळूण, संगमेश्वर, मंडणगडमध्ये 100 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मंडणगडमध्ये 112 तर चिपळूण, संगमेश्वरमध्ये 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर लांजा, राजापूर, गुहागर, खेड या तालुक्यांमध्ये 70 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details