रत्नागिरी - मुसळधार पावसाने गेले चार दिवस अक्षरशः झोडपून काढले होते. पावसामुळे चिपळूण आणि खेड बाजारपेठ पुराच्या वेढ्यात अडकली होती. मात्र, आता पावसाचा जोर ओसरल्याने पुराच्या पाण्याचा निचरा झाला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने शनिवारपासूनच हाती घेण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही आज पूरग्रस्त चिपळूण परिसर आणि दरड कोसळलेल्या परशुराम घाटाची पाहणी केली. दरम्यान गेल्या २४ तासांत ३२.७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड आणि खेडमध्ये ५० मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद गेल्या २४ तासांत झाली आहे.
अतिवृष्टीमुळे चिपळूण, खेड, दापोली, राजापूरमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यात चिपळूण आणि खेड शहरांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. वाशिष्ठी नदीला पूर आल्याने शुक्रवारी रात्रीपासून पाणी चिपळूण बाजार पेठेसह खेर्डी परिसरात घुसले. मोठ्या पुराची चाहूल लागल्याने अनेक व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवला होता. खेड शहरातही जगबुडी नदीला पूर आल्याने अशीच स्थिती होती. शनिवारी दिवसभर बाजारपेठा पाण्याखाली होत्या. मात्र, पावसाचा जोर कमी झाल्याने संध्याकाळी पाणी ओसरू लागले. आजही पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र होते. मात्र, पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीच्या पंचनाम्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. त्यासाठी वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आहेत. रविवारी दुपारपर्यंत चिपळूणमध्ये २४० पंचनामे करण्यात आले, तर खेर्डीमध्ये १३० पंचनामे झाले होते.