रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने यावर्षी दुसर्यांदा शहराला वेढा घातला आहे. रात्रीपासूनच राजापूर शहरातील जवाहर चौकामध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली. सध्या जवाहर चौक पुराच्या पाण्याने वेढला आहे.
Heavy Rain : रत्नागिरीतील राजापुरात पूरस्थिती, बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा वेढा जवाहर चौकात तीन फुटांपर्यंत पाणी
जवाहर चौकात सध्या साधारण तीन फुटांपर्यंत पाणी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आल्याने याचे पाणी शहरात शिरले आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत सतर्कतेचा इशारा दिला आहे. चौकात पाणी साचल्याने आता व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांतील सामान सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरूवात केली आहे.
मोठा भाग पाण्याखाली
दरम्यान, राजापूर शहरातील बंदरधक्का, मुन्शीनाका परिसर, वरचीपेठ परिसर, शिवाजीपथ आदी भाग पूराच्या पाण्याखाली आहे. तर शहरालगतचा शीळ, गोठणे दोनिवडे-चिखलगाव आदी गावांचा संपर्क तुटला आहे. याशिवाय उन्हाळे, दोनिवडे पंचक्रोशीतील गावांना जोडणारा रस्ताही पाण्याखाली गेल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नद्यांच्या काठावरील भातशेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, तहसिलदार प्रतिभा वराळे आदींनी शहरातील पूरस्थितीची पाहणी करून लोकांसह व्यापार्यांना सतर्कततेचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसामुळे गावांमधीलही जनजीवन विस्कळीत झालं आहे.
हेही वाचा -Weather forecast : कोकणसह मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी