रत्नागिरी - जिल्ह्यात यावर्षी विक्रमी पाऊस पडला आहे. मागील २९ वर्षांच्या तुलनेत यावर्षी झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. या वर्षीच्या पावसाने २०११ चाही विक्रम मोडला आहे. २०११ मध्ये जिल्ह्यात सरासरी ४६८० मिमी इतका पाऊस पडला होता. मात्र, यावर्षी सरासरी ४७८३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सध्याची पावसाची स्थिती पाहता यावर्षी पाऊस सरासरी ५ हजार मिमीचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा -लातुरात परतीच्या पावसाची दमदार हजेरी; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत
यावर्षी पाऊस काहीसा उशिरा सुरू झाल्याने शेतकरी वर्गासह सर्वच घटकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पण सुरुवातीला कमी पाऊस पडला होता. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. या दोन महिन्यांत पडलेल्या पावसाने अनुशेष भरून काढला आहे. ऐन गणेशोत्सवातही पावसाने धुमाकूळ घातला होता. सप्टेंबर महिन्यात सुरुवातीचे ८ ते १० दिवस मुसळधार पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. पण या मुसळधार पावसाने यावर्षी १० सप्टेंबरपर्यंत ४४०० ची सरासरी ओलांडली होती. त्यामुळे पाऊस २०११ चा विक्रम यावर्षी मोडणार हे निश्चित होते. पावसाने अखेर सरासरी ४७०० टप्पा ओलांडत गेल्या २९ वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद केली. पाऊस अजूनही चांगलाच बरसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाऊस सरासरी ५ हजार मिमीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.