महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या पुढचा हा कहर.. कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेले क्वारंटाईन केलेले रुग्ण - latest corona update ratanagiri

जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांचा धिंगाणा...कोरोनाबाधित महिलेची आरोग्य कर्मचाऱ्याला धमकी.. जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केलेले रुग्ण गेले कर्मचाऱ्यांच्या अंगावर... रिपोर्ट खोटे बनवले असल्याचा कांगावा करत गोंधळ... कोरोना वाॅर्डमधील कर्मचाऱ्यांनी मांडली जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफीयत...

कोरोनाच्या पुढचा हा कहर
कोरोनाच्या पुढचा हा कहर

By

Published : Apr 10, 2020, 4:55 PM IST

Updated : Apr 10, 2020, 6:35 PM IST

रत्नागिरी - जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना संशयित रुग्णांनी रात्री धिंगाणा घातला. कोरोना चाचणी 'पाॅझिटिव्ह' आलेल्या महिलेला विलगीकरण कक्षात जाण्यास सांगितले म्हणून, तसेच खोटा अहवाल बनवला असल्याचा कांगावा करत गोंधळ घातला. जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केलेले रुग्ण कर्मचाऱ्यांच्या अंगावरही धावून गेले. तर कोरोनाबाधित महिलेने आरोग्य कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचे या वार्डमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले.

जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा आता पाचवर गेला आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात कोरोेनाबाधित रुग्ण आणि संशयित नातेवाईकांनी थेट जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धमकी देत अंगावर धावून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. तसा आरोप जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यानंतर पारिचारिका, डॉक्टर आणि वॉर्डबॉय यांनी आक्रमक भूमिका घेत या साऱ्या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

रत्नागिरी

महत्त्वाची बाब म्हणजे हा सारा प्रकार जिल्हा शल्य चिकित्सक बोल्डे यांच्या कानावर घातल्यानंतर देखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी कर्तव्यावर असणारे कर्मचारी अरूण डांगे यांनी केला आहे.

साखरतर येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाच्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. यांचे अहवाल गुरुवारी रात्री आले. यातील एका महिलेचा अहवाल 'पॉझिटिव्ह' आला होता. या कोरोनाबाधित महिला रुग्णाला वेगळ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करावे लागेल, अशी माहिती संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली.

यावेळी या संशियत रुग्णांनी व कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या महिला रुग्णाने गोंधळ केला. तुम्ही अहवाल खोटे बनवून आणले असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून गेले. आम्ही तुम्हाला बघून घेऊ. उद्या सकाळी तुम्ही सगळे कुठे असाल हे तुम्हाला कळणार नाही, अशी धमकी कोरोनाबाधिताच्या नातेवाईकांनी दिल्याचा आरोप जिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे.

तसेच एक नातेवाईक भिंतीवरील ट्युबलाईट काढून अंगावर धावून आला, अशी माहिती कर्मचाऱ्याने दिली आहे. हे सर्व प्रकरण आम्ही जिल्हा शल्य चिकित्सकांना फोनवरून सांगितले, त्यांनीही फोनवरून सूचना केल्या. मात्र, कोणी अधिकारी इथे आला नाही, अशी तक्रार या कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे आमच्या सुरक्षेचे काय? असा सवाल आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली आहे.

Last Updated : Apr 10, 2020, 6:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details