रत्नागिरी - एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करावे, या मुख्य मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनामुळे अनेक कर्मचारी द्विधा मनस्थितीत सापडल्याचं दिसून येत आहे. सोमवारी दापोली एसटी आगारात याचाच प्रत्यय आला. दापोली एसटी आगारातील चालक अशोक वनवे हे चक्क हातात बांगड्या भरलेल्या अवस्थेत ड्युटीवर हजर झाले. दुुपारी 3 वाजता सुटणाऱ्या दापोली-ठाणे या शिवशाही बसवर त्यांची ड्युटी होती.
....म्हणून एसटी बस चालक हातात बांगड्या घालूनच कामावर हजर - आंदोलन
दापोली एसटी आगारातील चालक अशोक वनवे चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर झाले. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शासकीय सेवेत विलनीकरण करा अशी या कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. यासाठी राज्यभर हे आंदोलन सुरू आहे.
आपल्या व्यथा मांडताना त्यांनी सांगितलं की, आमचे एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे यंदा आमच्या कुटुंबाने दिवाळी साजरी केली नाही. अवघ्या 13 हजार रुपये पगारात घर कसे चालवायचे हा प्रश्न आमच्यासमोर आहे. एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, असे वनवे म्हणाले. आमच्या मागण्यांना आता आश्वासने नकोत तर आमचे दुःख समजुन घेऊन सकारात्मक निर्णय शासनाने घ्यावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान एसटी कर्मचार्यांची ड्युटी ही जोखमीची व त्रासदायक असते व ती ते चोखपणे पार पाडतात. त्यामुळे एसटी कर्मचारी यांच्या मागण्या शासनाने मान्य करून त्यांना दिलासा द्यावा, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनीदेखील व्यक्त केली आहे.
या आंदोलनावर तोडगा निघावा आणि एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.
हेही वाचा -पंतप्रधान नरेंद्र मोदी व यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी..