रत्नागिरी : बारसूतील रिफायनरी विरोधी आंदोलनात आज रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची वाट अडवली. आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिस बंदोबस्त बारसू परिसरातील जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी तैनात करण्यात आला आहे. आता पोलीस या आंदोलकांवर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकारामुळे बारसू परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रिफायनरीचा मुद्दा अजून तापण्याची चिन्हे :रिफायनरी सर्वेक्षणविरोधातील आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. प्रशासनाने नागरिकांना समज दिली. तरीही नागरिक आंदोलनावर ठाम आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे आज रिफायनरी मुद्दयावर पत्रकार परिषदही घेणार आहेत. या आंदोलनाला ठाकरे गटाचा पाठिंबा आहे. त्यामुळे रिफायनरीचा मुद्दा अजून तापण्याची चिन्हे आहेत. बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबईचे अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना सोमवारी राजापूरमध्ये अटक झाली. त्यांच्या आणखी दोन सहकाऱ्यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यांना रत्नागिरीत ठेवले असल्याची माहिती समोर येत आहे.
प्रसार माध्यमांना आंदोलन स्थळावरून हटवण्याचा प्रयत्न : आंदोलकांनी प्रकल्प हद्दपार होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, पोलिसांनी येथे जवळपास दोन हजारांचा फौजफाटा तैनात केला आहे. रिफायनरीला विरोध केल्यामुळे सोमवारी वैभव कोळवणकर यांच्या अटकेनंतर आंदोलकांचे अटकसत्र सुरू आहे. पोलिसांनी प्रसार माध्यमांना बारसू आंदोलन स्थळावरून हटवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
माध्यम प्रतिनिधींना पोलिसांची दमदाटी :स्थानिकांचा रिफायनरीला प्रचंड विरोध दिसून येत आहे. माध्यम प्रतिनिधींना पोलिसांनी दमदाटी केली. पोलिसांनी काही पत्रकारांना हाताला धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या भागातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणापूर्वी रत्नागिरी पोलिसांनी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव या गावांमध्ये सीआरपीसीचे कलम 144 लागू केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक रहिवाशांचा या प्रकल्पाला विरोध आहे. रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ४५ स्थानिक रहिवाशांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत.
जालियनवाला हत्याकांड होऊ शकते - रत्नागिरीतील वादग्रस्त प्रकल्प रिफायनरीसाठी सध्या जागेचे सर्वेक्षण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, या सर्वेक्षणाला रत्नागिरीतील स्थानिक नागरिकांनी व पर्यावरण प्रेमी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. रत्नागिरीतील बारसू या गावात स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमी संघटना आंदोलनाला बसल्या आहेत. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांना पोलीस बळाचा वापर करून धमकावले जात आहे, असा आरोप तिथल्या स्थानिकांनी केला आहे. तर, हे लोकं मागे न हटल्यास तिथे पोलिसांच्या मदतीने भविष्यात दुसरे जालियनवाला हत्याकांड होऊ शकतो. असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते मुंबईतील आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.