रत्नागिरी -कोरोनाचा सक्षमपणे सामना करण्यासाठी नवीन कोविड केंद्र उभारुन बेड्स व रुग्णसुविधेसाठी रुग्णवाहिका आदी सुविधांसोबत सर्वाधिक लक्ष ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर द्यावे आणि शक्य त्याठिकाणी ऑक्सिजन निर्मितीस प्रारंभ करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते काल (रविवारी) रत्नागिरी शहरातील महिला रुग्णालयातील समर्पित कोविड रुग्णालयाच्या 200 खाटांचा दुसरा टप्पा आणि राजापूर तालुक्यातील ओणी येथील 30 खाटांच्या समर्पित कोविड रुग्णालयाचे ऑनलाइन लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ऑक्सिजनची उपलब्धता जरुर ठेवा -
अगदी 8 दिवसांपूर्वी नैसर्गिक आपत्तीचे यशस्वी व्यवस्थापन करुन आता जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले. जिल्हा परिषदेतर्फे खास महिला व लहान बालकांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार ही निश्चित चांगली बाब आहे. सोबतच आपण ऑक्सिजनची उपलब्धता जरुर ठेवा, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता 1200 मेट्रीक टन आणि मागणी 1700 मेट्रीक टन अशी स्थिती दुसऱ्या लाटेत निर्माण झाली. त्यामुळे इतर ठिकाणांवरुन ऑक्सिजन आणावा लागला, अशी स्थिती यापुढे येणार नाही याची खबरदारी घ्या. कोरोनाचा सामना करताना अधिक सक्षम होण्याची आवश्यकता आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा -पूर्ण बहुमत असतानाही मोदींचा कारभार नियोजन शून्यच - पृथ्वीराज चव्हाण