रत्नागिरी- केंद्राचे पथक निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची संपूर्ण पाहणी न करताच माघारी परतले. याविषयी रत्नागिरीकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची पंतप्रधान कार्यालयाकडून त्वरीत दखल घेण्यात आली आणि केंद्रीय पथकाला पुन्हा रत्नागिरीचा दौरा करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, नागरिकांच्या तक्रारीची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून घेतली जाते, याचा सुखद अनुभव रत्नागिरीकरांना अनुभवता आला.
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या गावांची पाहणी करण्यासाठी 17 जून रोजी केंद्राचे पथक रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले होते. दौऱ्याची सुरुवात मंडणगड तालुक्यातून झाली होती. मात्र दापोली तालुक्यातील फक्त केळशी गावाला भेट दिल्यानंतर हे केंद्राचे पथक माघारी परतले. आपला नियोजित संपूर्ण दौरा या पथकाने केला नाही. त्यांनी आंजर्ले, पाजपंढरी, हर्णे, कर्दे, मुरुडची पाहणी केली नव्हती. त्यामुळे नाराज झालेल्या काही जागरूक ग्रामस्थांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर मात्र पंतप्रधान कार्यालयाने या पथकाला पुन्हा दापोली तालुक्याच्या दौऱ्यावर जाण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शुक्रवारी या पथकाने दापोली तालुक्यातील हर्णे, पाचपंढरी, मुरुड, कर्दे या गावांंची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात सर्वाधिक नुकसान झालेल्या आंजर्ले गावाला केंद्रीय पथकाने भेट घेत ग्रामस्थांशी संवाद साधला.