रत्नागिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी रत्नागिरीत भाजपची महाजनादेश यात्रा घेऊन येत आहेत. रत्नागिरीत त्यांची सभा होणार आहे. त्याकरता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर भव्य मंडप उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. या कामाची व त्या अनुषंगाने रस्ते, वीज आदीसंदर्भात आढावा भाजप उपाध्यक्ष तथा आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी सकाळी घेतला.
या मार्गावर कोणताही अडथळा होता कामा नये, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, वाहतूक कोंडी होऊ नये, आवश्यक त्या ठिकाणी पोलीस व वाहतूक पोलीस, होमगार्ड आदींबाबत आमदार लाड यांनी सूचना दिल्या. मंडपाचे काम वेगाने सुरू असून लवकरच फोल्डिंगचा मंडप पूर्ण होणार आहे. यामध्ये 20 बाय 60 फुटाचे व्यासपीठ उभारले जाणार आहे. या परिसरातील गवत काढणे, स्वच्छता तसेच मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना पालिका अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी वाहन व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे. याचा आढावासुद्धा घेण्यात आला. दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.