रत्नागिरी- पाणी टंचाईची तीव्र झळ शहराला बसू लागली असून, विहिरींची पातळीही खालावली आहे. असे असतानाही शहरातील पेजेवाडी येथील तलाव सुशोभिकरणाच्या नावाखाली बुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा तलाव बुजल्यास परिसरातील विहिरी आटून या भागालाही टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे तलाव न बुजवता सुशोभिकरण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
रत्नागिरी शहरातील तलाव सुशोभिकरणाच्या नावाखाली बुजवण्याचा प्रयत्न केला जाता आहे. रत्नागिरी शहरातील टिळक आळीच्या मागील बाजुला असणार्या पेजेवाडी परिसरात जुना तलाव आहे. १५ ते २० फूटापेक्षाही जास्त खोली असणार्या या तलावात कमळाची फुले मोठ्याप्रमाणात फुलत असत. गेल्या पाच सहा वर्षांपासून पेजेवाडीकडे जाणार्या रस्त्याजवळून हा तलाव कचरा टाकून हळूहळू बुजवण्यास सुरुवात झाली होती. या तलावात गटाराचे पाणीही येऊन मिळत असल्याने तलावातील पाणी खराब झाले होते. तलावात कमळाच्या जागी जलपर्णी व गवत उगवले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून या तलावात इमारतींचे डेब्रीज आणून टाकले जात आहे. त्यामुळे अर्धा तलाव बुजवण्यात आला आहे. मात्र, अर्धा तलाव अद्याप झाडाझुडपांनी वेढलेला आहे. मुळात तलाव बुजवण्यास सुरुवात झाल्यापासून परिसरातील विहिरींची पाण्याची पातळीही खालावू लागली आहे.
याच परिसरात राहणारे मंदार ढेकणे यांनी मुख्याधिकारी व जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन तलाव बजवू नये, अशी मागणी केली आहे. येथील विकासकामांना आमचा विरोध नाही. याठिकाणी उद्यान उभारण्याचा स्थानिक लोकप्रतिनिधींचा प्रयत्न आहे. मात्र, उद्यान उभारले तर तलाव बुजून त्यातील पाण्याचे झरेही नामशेष होतील. त्यामुळे तलावाच्या काही भागाचे योग्य पध्दतीने संवर्धन करुन, त्याभोवती वॉकिंग ट्रॅक किंवा बागेचे नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तलावाची खोली वाढवल्यास त्यात झर्यांचे संवर्धनही होईल व परिसरातील विहिरींची पाणी पातळीही कायम राहील, अशी मागणी केली आहे.