रत्नागिरी- चिपळूण नगर पालिकेच्या सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मारेकऱ्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना तीन महिन्यांनी यश मिळाले आहे. समलैंगिक संबंधातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आकाशकुमार नायर, असे बेड्या ठोकण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
चिपळूण नगरपालिकेच्या विहिरीशेजारी बावशेवाडी येथे 2 जानेवारी 2019 ला सकाळी 8.15 वाजताच्या सुमारास रामदास सावंत यांचा मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्याचा तपास सध्या चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांच्याकडे होता. गुन्ह्याच्या तपासात मृत रामदास सावंत हे 1 जानेवारीला रात्री 9 वाजताच्या सुमारास चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकावर आले होते. तेथे काही काळ थांबून त्यांच्या दुचाकीवर एक व्यक्ती बसल्यानंतर त्याच्यासह ते निघून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये निष्पन्न झाले होते. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिल्यानंतर सावंत यांच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीचा चेहरा अस्पष्ट दिसत होता. त्याचा चेहरा अस्पष्ट असल्याने पोलिसांनी त्याचे स्केच तयार केले होते.
याठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे 31 डिसेंबर 2018 चे फुटेज पाहिले असता, सावंत यांच्या दुचाकीवरून एक जानेवारीला बसून जाणाऱ्या व्यक्तीप्रमाणे चाल असणारा व पँटवर समोरील बाजूस कमरेजवळ की-चेन लावलेला संशयित दिसून आला. त्याच्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, चिपळूण पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा रत्नागिरी यांच्याकडून वेगवेगळी पथकं तयार करून शोधमोहीम सुरु केली. या पथकाला संशयित हा खेर्डी येथे राहणारा आकाशकुमार नायर असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी त्याला गुरुवारी ताब्यात घेवून चौकशी केली असता, सावंत यांचा खून केल्याचे त्याने कबूल केले.