रत्नागिरी-रेल्वेतील खाद्यपदार्थांमध्ये कधी काय सापडेल याचा काही नेम नाही. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्येही एका प्रवाशाच्या बाबतीत असाच प्रकार घडला आहे. पण हा खाद्यपदार्थ खाल्ल्याने या प्रवाशाच्या मुलाच्या जीवावर बेतले असते. काय आहे हा सर्व प्रकार आणि रेल्वेचा भोंगळ कारभार कसा आहे पाहूया या रिपोर्टमधून.
विक्रेत्याला जाब विचारताना नागरिक. तसेच मुलाचे वडील, आत्या आणि अधिकारी यांच्या प्रतिक्रिया रत्नागिरी पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे सचिन शिंदे हे त्यांची पत्नी आणि दक्ष या दोन वर्षाच्या मुलासोबत 15 जुलै रोजी मत्स्यगंधा एक्स्प्रेसने मुंबईहून रत्नागिरीला येत होते. शिंदे यांनी दक्षसाठी रेल्वेतील विक्रेत्याकडून पॅकबंद डालवडा घेतला. हा वडा खात असताना दक्षला जोरात ठसका लागला. त्यावेळी वडिलांना त्याच्या घशात प्लास्टिक अडकल्याचे आढळले. यांनंतर त्यांनी वडा तपसाला असता उरलेल्या अर्ध्या वड्यात देखील प्लास्टिकचे तुकडे होते. ही बाब त्यांनी तत्काळ खेड स्थानकात उतरून या विक्रेत्याला दाखवली. मात्र, हे प्लास्टिक नसून लसूण असल्याचा कांगावा या विक्रेत्याने सुरुवातीला केला. मात्र, जमलेल्या प्रवाशांनी सुनावल्यावर तो भानावर आला. यानंतर या रेल्वेत खानपान विक्रीचा ठेका घेणाऱ्याला बोलावल्यावर त्याने तुम्हाला काय करायचे ते करून घ्या असे उर्मटपणे उत्तर दिले.
रत्नागिरीत आल्यानंतर दक्षला उलटी-जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शिंदे यांनी आपल्या मुलाला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. तीन दिवस उपचार घेतल्यावर आता या मुलाची प्रकृती सुधारली आहे. या मुलाच्या उलटी मधूनही प्लास्टिक तुकडे पडल्याचे दिसून आले आहे. सचिन शिंदे यांनी याबात रेल्वे प्रशासानाकडे तक्रार नोंदवूनही याबाबत विक्रेत्यावर कारवाई झालेली नाही.
पॅकबंद खाद्यपदार्थांच्या पाकिटावर 'साई केटरिंग सर्व्हिस' हे रेल्वेतील अधिकृत वेंडर्स असल्याचे छापण्यात आले आहे. सचिन चव्हाण यांनी या संदर्भात रेल्वे मदत अॅपवर तक्रार केली. मात्र, या ट्रेनमध्ये साई कॅटरिंग सर्व्हिस हे अधिकृत विक्रेते नाहीत, असा मॅसेज त्यांना आला. त्यामुळे रेल्वेच्या एकूण कारभारावरच संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी कोकण रेल्वे प्रशासनाला विचारल्यानंतर त्यांनी या संदर्भात चौकशी करून कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली आहे.
रेल्वे प्रवाशांच्या वारंवार तक्रारी येऊनही कोकण रेल्वेमधील खानपान सेवा अद्यापही सुधारल्याचे दिसत नाही. कोकण रेल्वेतील पदार्थ विक्रीसाठी अधिकृत खाद्यविक्रेते नेमण्यात आले आहेत. मात्र, साई केटरिंग हे अधिकृत नसल्याचे सांगत रेल्वेनी आपल्या भोंगळ कारभारावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे साई केटरिंग सव्हिर्सेसवर नेमका कोणाचा वरदहस्त आहे, हे एक कोडे आहे. आता या साई केटरिंग सर्व्हिसेसवर काय कारवाई होते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. पण कुणाच्या तरी जीवावर बेतण्याअगोदर कोकण रेल्वेने आशा बोगस विक्रेत्यांबाबत कठोर पावले उचलणे अपेक्षित आहे.