रत्नागिरी - खड्ड्यांमुळे शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मुख्य रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक बेजार झाल्याने या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत लक्ष्य वेधण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने अनोखे आंदोलन केले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून शहरातील खड्डेमय रस्त्यांची परिस्थिती सांगणारे प्रदर्शन भरवण्यात आले.
रस्त्यांवरील मोठ्या खडड्यांमुळे नागरिक बेजार झाल्याने या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत लक्ष्य वेधण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने अनोखे आंदोलन केले. सद्या शहरातील बहुतांश रस्त्यांची अवस्था खड्डेमय आहे. शहरातील माळनाका, मारुती मंदिर, टिळक आळी तसेच पऱ्याची आळी, काँग्रेस भवन, साळवी स्टॉप येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते व माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खड्डेमय रस्त्यांची व्यथा मांडण्यात आली असून शहरातील विविध ठिकाणच्या मोठ्या खड्ड्यांचे फोटो ठेवले आहेत.
हे अनोखे प्रदर्शन पाहण्यासाठी अनेक रत्नागिरीकरांनी गर्दी केली होती. अनेकांनी रस्त्यांची ही दुर्दशा पाहून नगरपरिषदेच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. या खड्ड्यांमुळे होडीत बसल्यासारखे वाटते, असे प्रदर्शन पाहायला आलेल्या काही वाहन चालकांनी सांगितले. या खड्डेमय अवस्थेला प्रशासन व राजकीय पुढारी जबाबदार असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला. शहराला खड्डेमय करणाऱ्या अशा लोकांना आपण निवडून देताना विचार केला पाहिजे, अशी भावना काहींनी व्यक्त केली.
शहरातील रस्त्यांची कामे दर्जाहीन असून आज रस्त्यांवर 80 टक्के खड्डे आहेत. हे असेच सुरू राहिल्यास 100 टक्के रत्नागिरी खड्ड्यांतच राहील, अशी टीका माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांनी केली.