रत्नागिरी- दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोरोनाचे सावट असले, तरी बाजारपेठा सजू लागल्या आहेत. त्यातच दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू बनवण्याचे कामही अनेक ठिकाणी सुरू आहे. रत्नागिरीतील अविष्कार या गतिमंद शाळेतील मुलांनीही दिवाळीसाठी आकर्षक अशा वस्तू तयार केल्या आहेत. यावर्षी कोरोनामुळे शाळा बंद आहेत, त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी घरीच या वस्तू बनवल्या आहेत. या गतिमंद मुलांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीतून पैसा मिळतो तो या मुलांनाच दिला जातो. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ हा उपक्रम रत्नागिरीत राबवला जात आहे. त्यामुळे या मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ मिळते.
गतिमंद मुलांच्या हस्तकौशल्याचा 'अविष्कार' शाळा बंद असल्याने घरीच बनवल्या दिवाळीसाठी वस्तूकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा बंद आहेत. परंतु, अविष्कार संस्थेतील शामराव भिडे कार्यशाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी मात्र दिवाळीसाठी कलात्मक वस्तूंची निर्मिती करण्याची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी परिस्थिती थोडी वेगळी आहे. शाळा बंद असल्याने मुलांना ऑनलाईन प्रशिक्षण देऊन, आवश्यक ते साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवून प्रशिक्षण व वस्तू निर्मिती केली जात आहे. कार्यशाळा शिक्षक व कर्मचारी यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. या मुलांनी आकाशकंदील, पणत्या, ग्रीटींग्स, सुगंधी उटणे, विविध रंगबीरंगी मेणबत्ती तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व वस्तू हे विद्यार्थी स्वत बनवतात आणि या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठेतही चांगली मागणी असते. जगापासून अलिप्त असणारी ही मुले यातच आपले जग शोधत असतात. दिवाळीच्या निमित्ताने अंधकारमय जगात ते आपल्या मेहनतीतून जगण्याची प्रकाश वाट शोधत असतात.
या मुलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी धडपडआपल्यात काहीतरी कमी आहे, याची जाणीवही नसणारी ही मुले दिवाळीसाठी बनवत असलेल्या या विविध प्रकारच्या वस्तू पाहून मन थक्क होते. दरवर्षी अविष्कार संस्थेतील शामराव भिडे कार्यशाळेत ही मुले या वस्तू बनवतात, यावर्षी मात्र कोरोनामुळे हे सर्व विद्यार्थी घरीच या वस्तू बनवत आहेत. या अशा प्रकारच्या हस्तकौशल्यातून या मुलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी येथील शिक्षक धडपडत असतात. आणि विशेष म्हणजे या वस्तूंच्या विक्रीतून येणारा पैसा हा इथल्या मुलांमध्येच वाटला जातो. या मुलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी अविष्कार संस्थेचा हा उपक्रम गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ सुरू आहे.
मुलांची ही धडपड निश्चितच कौतुकास्पदया मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन आजही बदललेला नाही. मात्र, समाजापासून काहीसे दुर्लक्षीत असणाऱ्या या मुलांची स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी दिवाळी हा सण या मुलांसाठी संधी घेऊन येतो. त्यामुळेच या मुलांची सुरू असलेली ही धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे, अशा मुलांच्या जिद्दीला खऱ्या अर्थांन सलाम.
सरकारच्या आवाहनाचे पालन करादिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आहे. मात्र, सणावार सध्या कोरोनाचे सावट असल्याने हा सण साजरा करताना अनेक मर्यादा आल्या आहेत. सरकारने जनतेच्या हितासाठी काही आवाहने केली आहेत. त्यांचे पालन सर्वांनीच करणे आवश्यक आहे.