रत्नागिरी - साखरीनाटे येथे कोविड योद्ध्यांवर हल्ला झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच सर्वेक्षणासाठी गेलेल्या आरोग्य सेविकेशी नागरिकांनी हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आला. दापोली तालुक्यातील अडखळ गावातील जुईकर मोहल्ला येथे ही घटना घडली. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वेक्षणासाठी गेलेल्या आरोग्य सेविकेसोबत गैरवर्तन; 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल - दापोली आरोग्य सेविका गैरवर्तन
सर्वेक्षणासाठी गेलेल्या आरोग्य सेविकेशी नागरिकांनी हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आला. दापोली तालुक्यातील अडखळ गावातील जुईकर मोहल्ला येथे ही घटना घडली. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आसूद आरोग्य केंद्रातील एक आरोग्य सेविका अडखळ गावातील जुईकर मोहल्ला येथे गुरुवारी आरोग्य सर्वेक्षणासाठी गेल्या होत्या. या भागातील काही नागरिकांनी त्यांच्याशी हुज्जत घालत सर्वेक्षणासाठी अटकाव केला. तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून येथे आला आहात? तुमचे नाव काय? तुम्हाला कोणत्या आरोग्य पर्यवेक्षकाने येथे पाठवले आहे? तुम्हाला कोणी पाठविले, त्याचे नाव सांगा, तुमच्या सुपरवायझरला येथे बोलवा, अशा प्रश्नांचा भडिमार त्यांच्यावर करण्यात आला.
या महिला आरोग्य कर्मचाऱ्याने सर्वांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करूनही त्यांचे कोणी ऐकले नाही. अखेर या महिला आरोग्य कर्मचारी तेथून परत आल्या व त्यांनी हा प्रकार आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातला. या प्रकारामुळे दापोली तालुक्यातील आरोग्य विभागाचे कर्मचारी संतप्त झाले आहेत. शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात कारवाई न केल्यास काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.